Pune : पोलिसांच्या एनओसीसाठी महापालिका आयुक्तांनी मार्ग काढावा – राजेश येनपुरे

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या एनओसीसाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मार्ग काढावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक राजेश येनपुरे यांनी केली आहे.

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकासकामे केली जातात. त्या करिता नगरसेवक, आमदार, खासदार, यांच्या वतीने विविध विकासकामे सुचविली जातात. ती कामे साधारणतः फेब्रुवारी, मार्चमधील बजेटमध्ये मंजूर केली जातात. ही कामे मार्गी लावण्यास साधारणतः मे, जून उजाडतो. जून ते नोव्हेंबर पावसाळ्यामुळे रस्ते खोदाई करणे बंद असते. नोव्हेंबर नंतर ती कामे होणे क्रमप्राप्त असते. परंतु, वाहतूक शाखेची पोलीस परवानगी या कामासाठी ना हरकत पत्रे (एनओसी) लागते. त्यामुळे त्यांच्याकडे ना हरकत पत्रासाठी 1 ते 2 महिने कालावधी लागतो. त्यामुळे विकासकामे सुरू होण्यास विलंब होतो.

ही कामे पुणे महापालिकेची असताना, रस्ते व बजेट पुणे महापालिकेचे असताना पोलीस वाहतूक शाखेची परवानगी घेणे यासंदर्भात जरुरी आहे का? असा प्रश्न पडला आहे. कामे सुरू करत असताना पोलीस वाहतूक शाखेला त्या संदर्भात माहिती देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, त्या ना हरकत पत्र मिळण्यासाठी अर्ज करणे त्यासाठी 1 ते 2 महिने लागणे योग्य वाटत नसल्याचे राजेश येनपुरे यांनी म्हटले आहे.

या संदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले आहे. रस्ते आपले, बजेट आपले असताना त्या खात्याचा या संदर्भात हस्तक्षेप योग्य आहे का नाही, याचा विचार पडला आहे. त्यामुळे नागरिकांची विकासकामे त्वरित सुरू होण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेशी आयुक्तांनी चर्चा करून मार्ग काढावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like