Pune : शासनाकडे लेखी मागणीद्वारे पाणी वाढवून मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला मागे

एमपीसी न्यूज – शहरासाठी वाढीव पाणी मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, ही लोकसंख्या पालिकेस मंजूर असलेल्या पाणीकोट्याच्या लोकसंख्येपेक्षा जवळपास दहा लाखांनी कमी आहे. त्यामुळे शासनास पाणी वाढवून देण्यासाठी पत्र पाठविल्यास निकषानुसार, महापालिकेस मंजूर पाणी आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाकडे लेखी मागणीद्वारे पाणी वाढवून मागण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
शासनाने महापालिकेस 2011 मध्ये मंजूर केलेला पाणीकोटा हा 49 लाख लोकसंख्येसाठी आहे तर, शहराची नोंदणीकृत व तरल लोकसंख्येचा विचार करता ही केवळ 39 लाखच होत असल्याचेही प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे.

या वर्षी धरणे भरलेली नसल्याचे सांगत कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी केवळ 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यातच या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेस कल्पना ना देता पाटबंधारे विभागाने याची अंमलबजावणी सुरू केल्याने पुणे शहरावर ऐन दिवाळीत पाणी कपातीची वेळ आली असून पुणेकरांना सोमवारपासून दिवसातून एकवेळ पाणी दिले जाणार आहे.
महापालिकेस 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये महापालिकेस शहरासाठी सुमारे 11.50 टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. या 20 वर्षांत शहराची लोकसंख्या 18 लाखांवरून सुमारे 35 लाखांवर पोहचली आहे. मात्र, पाणी कोटा तेवढाच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या लोकसंख्येनुसार, प्रतिव्यक्‍ती दीडशे लिटर आणि शहरातील पाण्याची 30 टक्के गळती लक्षात घेऊन शहरासाठी आवश्‍यक वाढीव पाणी कोट्याची मागणी केली जाणार होती.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने शहरातील लोकसंख्या 34 लाख असल्याचे कळविले आहे. त्यातच, 4 लाख लोकसंख्या तरल (फ्लोटिंग) आणि 11 गावांची 2 लाख अशी गृहीत धरली, तरी ही संख्या 30 ते 40 लाखच होते. तर, मंजूर कोट्यानुसार, 49 लाख लोकसंख्येसाठी प्रतिव्यक्‍ती 150 लिटरप्रमाणे 11.50 टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. आता पालिकेने 40 लाखांची आकडेवारी गृहीत धरून कोटा वाढविण्याची मागणी केल्यास पालिकेचे पाणी आणखी 2 ते 3 टीएमसीने कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.