Pimpri News: पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पालिकेची नोटीस, ‘सात दिवसात कर भरा, अन्यथा मालमत्ता सील’  

25 लाखांपुढील 325 थकबाकीदारांना पालिकेच्या नोटीसा

एमपीसी न्यूज – पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या  गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस दिली आहे. संथेने 1 कोटी 83 लाख मालमत्ता कर थकविला आहे. तसेच 25 लाखांच्या पुढील थकबाकी असलेल्या 325 मालमत्ताधारकांनाही महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांच्या आत थकबाकी भरावी. अन्यथा मालमत्ता सील करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक तीन हजार 700, मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. परंतु, अनेक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. कर थकविला आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे.

महापालिकेने थकबाकीदारांवर  कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. 16 विभागीय कर संकलन कार्यालयामार्फत  थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 25 हजारांपासून पुढे थकबाकी असलेल्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. प्राधान्याने 25 लाखांच्या पुढील थकबाकीदारांना नोटीसा दिल्या आहेत. 25 लाखांपुढील 325 थकबाकीदार आहेत. या सर्वांना नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांत थकबाकी भरण्यात यावी. अन्यथा मालमत्ता सील करण्यात येईल, असे नोटीसीत म्हटले आहे.

यामध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला देखील नोटीस दिली आहे. त्यांच्याकडे 1 कोटी 83 लाखांची थकबाकी आहे. नियमानुसार त्यांना नोटीस दिली असल्याचे कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.