Talegaon : नगरपरिषदेतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी दरमहा 2000 रुपये पेन्शन योजना सुरू

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात शहरातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा दोन हजार रूपये पेन्शन योजना सुरू केली असून आतापर्यंत २७५ दिव्यांग व्यक्तींना या योजेनेचा लाभ मिळाला आहे.

नगरपरिषद गेली चार वर्षे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अनुदान देत आहे. आतापर्यंत नगरपरिषदने प्रत्येक वर्षासाठी २४ हजार रुपयांचे वाटप दिव्यांग व्यक्तीस एकरकमी केले आहे. पुणे जिल्हा प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष रमेश शिंदे यांच्या पाठपुराव्याने स्थानिक दिव्यांग व्यक्तींच्या मागणीनुसार दरमहा पेन्शन देण्याचा ठराव काही महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

मुख्याधिकारी दीपक झिंजाट तसेच दिव्यांग कक्ष वरिष्ठ अधिकारी विभा वाणी यांनी सर्वसाधारण सभेच्या ठरावाची अमंलबजावणी करून लाभार्थी दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्यावर पेन्शनची रक्कम नुकतीच जमा केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांची पेन्शन रक्कम म्हणजेच चार हजार रूपये खात्यावर जमा झाल्याने दिव्यांग बांधवांचा दिवाळीचा सण गोड झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.