Pune News : पालिकेचे वरातीमागे घोडे; कोरोना लाट ओसरताना कार्डिॲक ॲम्बुलन्सची खरेदी !

एमपीसी न्यूज : गेल्या 8 महिन्यांपासून  कोविड 19 विषाणुमुळे निर्माण झालेल्या कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर घोंगावलं. पुण्यातील जवळपास 4500 हून जास्त पुणेकरांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असताना स्थायी समितीकडून महापालिकेने 32 लाख खर्चून कार्डिॲक ॲम्बुलन्स खरेदी केली आहे.

सुसज्ज वैद्यकीय उपकरणांसह त्यावर आवश्यक मनुष्यबळ व अत्यावश्यक खर्च पकडून हा 32 लाख 41 हजार 335 रुपये खर्च होणार आहे. सध्या ही ॲम्बुलन्स सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागून वापरली जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात पावणेदोन लाख लोकांना कोरोना झाला; त्यातील सुमारे साडेचार हजार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर आता कुठे महापालिका आपली उपचार यंत्रणा अधिक सक्षम करीत आहे. अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी “कार्डिऍक ऍम्ब्युलन्स’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने आज घेतला.

कोरोनाच्या साथीत ही सुविधा उपलब्ध होणार असून, पहिल्या टप्प्यात आता एक रुग्णवाहिका घेतली जाईल. ती संपूर्ण शहरासाठी वापरण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. कोरोनाच्या साथीत अत्यवस्थ रुग्णांना तातडीच्या आणि नेमक्‍या उपचारासाठी “कार्डिऍक ऍम्ब्युलन्स’ ची गरज भासत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, अशा रुग्णांची संख्या वाढूनही महापालिकेकडे ही व्यवस्था नसल्याने काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

रुग्णालयापर्यंत पोचताना पुरेशा क्षमतेने ऑक्‍सिजन न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मृतांमध्ये एक टिव्ही जर्नालिस्ट यांचा देखील समावेश होता. खासगी रुग्णालयांकडील कार्डिऍक ऍम्ब्युलन्स अपुऱ्या ठरल्या. त्यात या रुग्णवाहिकेचे दरही परवडत नसल्याने सामान्यांना ती उपलब्ध होऊ शकली नाही. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडे अशा रुग्णवाहिकेची सोय असावी, अशी अपेक्षा नागरिकांची होती. त्यानुसार ती खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला.

मात्र, आरोग्य खात्याला वर्षाकाठी सुमारे साडेतीनशे-चारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. त्यातून ही सोय करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून फुटकळ कामांवरच आरोग्य खात्याचा खर्च होत असल्याचे चित्र आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची साथ कमी झाली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील स्थिती पाहता आता तातडीने “कार्डिऍक ऍम्ब्युलन्स’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.