Pimpri : स्पाईन रोड बाधितांचा प्रश्न निकालात, उर्वरित बाधितांना मिळणार भूखंड, महापालिकेने काढली सोडत

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. 126 रहिवाशांपैकी उर्वरीत 46 लाभार्थींसाठी महापालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) सोडत काढण्यात आली.

त्यामुळे लाभार्थ्यांना भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाधितांना भूखंड मिळवून देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. लाभार्थी नागरिक व प्राधिकरण यांच्यामध्ये ‘लीज डीड’ झाल्यानंतर महापालिका नागरिकांना भूखंडाचा ताबा देणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार,  फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागामार्फत लाभार्थ्यांना भूखंडाबाबत माहिती देत त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

स्पाईन रस्ता विकसित करत असताना त्रिवेणीनगर चौकातील काही घरे बाधित होत होती. त्या बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करुन जागा मंजूर करुन घेतली. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 11 मधील 14  हजार 784 चौरसमीटर जागा यापूर्वीच प्राधिकरणाने 9 हजार 350 प्रति चौरस मीटर या दराने महापालिकेच्या ताब्यात दिली होती.

या भूखंडावर महापालिकेने स्पाईन रोड बाधितांचे पुर्नवसन हाती घेतले होते. तथापि,ही जागा पुनर्वसनाठी अपुरी पडत होती. आमदार लांडगे यांनी पाठपुरावा करत पीसीएनटीडीएकडून 6282.72 चौरस मीटर वाढीव क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध करून घेतला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 11 मधील पर्यायी निवासी जागा मंजूर करण्यात आली. 75 मीटर स्पाईन रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 52 मीटर ते 60 मीटर रस्ता बाधितांच्या पुनर्वसनासाठी नगररचना विभागामार्फत 126 जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 77 लाभार्थ्यांची सोडत 27 ऑगस्ट 2018 रोजी काढण्यात आली होती. उर्वरित 46 लाभार्थ्यांची सोडत अखेर आज मार्गी लागली आहे. त्यामुळे बाधितांना भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाभार्थी नागरिक व प्राधिकरण यांच्यामध्ये ‘लीज डीड’ झाल्यानंतर महापालिका नागरिकांना भूखंडाचा ताबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.