Pimpri : महापालिकेतर्फे सफाई कर्मचा-यांना स्वाईन फ्लूची लस मोफत द्यावी

अॅड. सागर चरण यांची मागणी

एमपीसी न्यूज – शहरामध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. स्वाईन फ्ल्यूने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज वेगवेगळी स्वच्छतेची कामे करतात. त्यामुळे कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेतर्फे सफाई कर्मचा-यांना स्वाईन फ्ल्यूची लस मोफत द्यावी, अशी मागणी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी केली.

अॅड. सागर चरण यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वाईन फ्ल्यूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस देण्याची व्यवस्था केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेची दक्षता घेण्यात येत असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी पासून आजपर्यंत 228 जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडत आहे. अशा वातावरणात स्वाईन फ्ल्यू आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्ल्यूचे जिवाणू अशा वातावरणात साधारणतः 48 तास जिवंत राहतो. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून स्वच्छतेची कामे करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महापालिकेकडून सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर, कोपरा सभा, भित्तीपत्रके असे उपक्रम राबविण्यात यावेत. महापालिकेकडून सफाई कामगारांना सुरक्षा साधने द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.