Pimpri News : स्मशानभूमी, दफनभूमीमध्ये अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी. त्याबाबत स्थायी समिती, महापालिका सभेमध्येही ठरवा झाला आहे. आयुक्तांनीही आदेश दिला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड शहरातील हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, बौद्ध, लीयागत गावळी समाज महानुभाव पंथ, गोसावी समाज नाथपंथी, बालीयान समाज आदी समाजाच्या लोकांसाठी सर्व स्मशानभूमी व दफनभूमी मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची, दफन करण्याचा खर्च महापालिकेकडून करण्याची योजना राबवावी अशी आमची सन 2015 पासून मागणी होती. यासाठी अनेक पत्रव्यवहार व आंदोलने करून ही योजना मंजूर करून घेतली.

या योजनेबाबत स्थायी समिती, महापालिका सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी होण्याबाबत तत्कालीन आयुक्तांनी 2 मे 2016 रोजी आदेश केला. परंतु, या योजनेची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. जनहिताच्या विषयांबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला बिलकूल वेळ व संवेदनशीलता नाही असे आम्हाला वाटते. त्यामुळे आपण या जनहिताच्या मागणीबाबत तातडीने योग्य ती पाउले उचलावीत. अन्यथा आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी पक्ष व प्रशासनाची असेल, असे भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.