Pimpri News : बायोमेट्रीक मशिनच्या देखभालीवर महापालिका वर्षाकाठी करते 13 लाखाचा खर्च

कोरोना काळात थम्ब इंप्रेशन बंद असतानाही ठेकेदाराला दिले पैसे

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा माहिती व तंत्रज्ञान विभाग भ्रष्टाचाराचा कुरण झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महापालिका कर्मचा-यांच्या हजेरीसाठी असलेल्या बायोमेट्रीक थम्ब इंप्रेशन मशिनच्या देखभालीवर महापालिका वर्षाकाठी तब्बल 13 लाखांचा खर्च करते. विशेष म्हणजे कोरोना काळात मार्चपासून दहा महिने मशिन बंद असतानाही टेक नाईन सर्विसेस या ठेकेदाराला महापालिकेने मशिन देखभाल दुरुस्तीचे पैसे अदा केले आहे. हा विभागातील ‘भ्रष्टाचारयुक्त’ कारभाराचा मोठा नमुना असल्याचा आरोप होत आहे.

महापालिका कर्मचा-यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक मशिन बसविण्यात आल्या आहेत. महापालिका मुख्यालय, दवाखाने, रुग्णालये, प्रभाग कार्यालयांमध्ये या मशिन आहेत. कर्मचा-यांची पगार बिले मशीनवरील हजेरीपत्रकाच्या आधारे काढले जातात. शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.

कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याने महापालिकेने बायोमेट्रीक मशिन बंद केल्या. जवळपास दहा महिने मशिन बंद आहेत. असे असताना महापालिकेने  टेक नाईन सर्विसेस या ठेकेदाराला देखभाल दुरुस्तीचे 12 लाख 98 हजार 700 रुपयांचे बिल अदा केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विभागाकडे कोणाचे लक्ष नसल्याचा हा परिणाम आहे.

स्मार्ट सिटी असल्याचा गवगवा केला जातो. पण,  बायोमेट्रीक मशिनची साधी इंटर कनेक्टीव्हीटी देखील नाही. पगार बिले काढण्यासाठी पेन ड्राईव्ह घेवून फिजीकली जावून डेटा आणावा लागतो. हजेरीपत्रक ई-मेल केले जाते. त्यामुळे मशीनचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मशिनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची दरवर्षी निविदा प्रसिद्ध केली जाते. परंतु, त्यात केवळ टेक नाईन सर्विसेसचा पात्र होतात.

रजा असली तरी लागतेय हजेरी ?
कर्मचारी रजेवर असला. तरी त्याची गैरहजेरी लागत नाही. सायंकाळी तेथील एक कर्मचारी थम्बमध्ये अॅडजस्ट करुन देतो. त्यासाठी प्रत्येकी 200 रुपये घेत असल्याची माहिती आहे. कोरोना काळात अनेक कर्मचारी घरी होते. तरी, देखील त्यांना पूर्ण पगार दिला. काम केले नसतानाही पगार कशाच्या आधारे दिला असा सवाल उपस्थित होत आहे.

ठेकेदार बसताहेत महापालिका कार्यालयात!
टेक नाईन सर्विसेचे ठेकेदार माहिती व तंत्रज्ञान विभागात बसतात. दिवसभर तेथूनच ते काम करतात. त्यांना महापालिकेने संगणक देखील दिला आहे. महापालिकेच्या साहित्याचा वापर करतात. ठेकेदाराने महापालिकेत काम करत बसणे कोणत्या नियमात बसते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप केला जातोय.

याबाबत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, ”मशीनमधील जुना डेटा काढणे, निवृत्त कर्मचा-यांची माहिती देणे, बॅकअप घेणे, विभागाला आवश्यकतेनुसार माहिती देणे. त्यासाठी दोन लोकांची नियुक्ती केली आहे. मशिन देखभालीच्या कामासाठी 13 लाख रुपयांचा खर्च येतो.  ठेकेदारांचे कर्मचारी पालिकेत काम करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेकेदार पालिकेत बसतात”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.