Pune News : महापालिकेकडून होणार लसीकरणाची रंगीत तालीम !

एमपीसी न्यूज : आगामी काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जाणार आहे. त्या पार्श्वभुमीवर महापालिकेकडून येत्या शनिवारी (दि. 9 जानेवारी) येरवड्यात राजीव गांधी रूग्णालयात रंगीत तालीम (ड्राय रन) होणार आहे.  

राज्य सरकारकडून यापूर्वी पुण्यात पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण हद्दीतील मान प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा औंध रुग्णालय येथे 2 जानेवारी रोजी लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम करण्याची घोषणा केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी रंगीत तालमीच्या नियोजना संदर्भात संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

यामध्ये आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती आणि सर्व जिल्हयातील आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.

पुणे शहरातील नियोजनानुसार, राजीव गांधी रुग्णालयात 25 आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. या लसीकरण बुथवर सुरक्षा रक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, लस टोचक अशा 5 जणांचा समावेश असणार आहे. हे मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे. यामध्ये नावनोंदणी, लस टोचणे

आदी प्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.