Chikhali : महापालिका करणार 2200 झाडांची कत्तल, दीड हजार झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीची बिनबोभाट मान्यता

एमपीसी न्यूज –  चिखली येथील गट नंबर 1654 या गायरान जागेवर जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तब्बल 2200 झाडांची तीन टप्प्यात कत्तल करणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 526 झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने आज (शनिवारी) बिनबोभाट मान्यता दिली. झाडाची फांदी तोडण्याची परवानगी देण्याअगोदर पाहणी करणा-या समितीतील सदस्यांनी 2200 झाडे तोडण्यास बिनबोभाट मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, 227 झाडांचे पुनर्रोपण करणार असल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची सभा आज (शनिवारी) पार पडली. समितीचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर सभेला गैरहजर होते. त्यामुळे कार्याध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शीतल शिंदे, श्याम लांडे, नवनाथ जगताप, सदस्य संभाजी बारणे, उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक सुरेश साळुंखे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत उपस्थित होते. विषयपत्रिकेवर नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याच्या चिखलीतील गट नंबर 1654 या जागेवरील झाडे तोडण्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. त्याला समिती सदस्यांनी विनाचर्चा मान्यता दिली.

आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहाराला पाणी आणण्यात येणार आहे. त्याकरिता चिखली येथील गायरान जागेवर जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. 300 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र चिखलीतील बग वस्ती येथील सुमारे 8 हेक्टर गायरान जागेत बांधण्यात येणार आहे. तीन टप्प्यात त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गायरान जागेतील तब्बल 2200 जागे तीन टप्प्यात तोडण्यात येणार आहेत.  झाडे हटविण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाने उद्यान विभागाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एक हजार 526 झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने बिनबोभाट मान्यता दिली.

‘ही’ झाडे तोडणार
सागवान 83, कडूनिम 38, चिंच 22, जारूळ 12, पेल्टोफोरम 13, करंज 18, कांचन 19, पिंपळ 22 या 227 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर, निलगिरी 251, काटेरी बाभुळ 21, खैर 43, सुबाभुळ 84, ग्लेरीसिरिया 1 हजार 127 अशी एकूण 1 हजार 526 झाडू पूर्णपणे काढून टाकली जाणार आहेत.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”आंद्रा व भामा-आसखेड धरणातून शहारासाठी पाणी आणण्यात येणार आहे. त्याकरिता चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे.  त्यामुळे गायरान जागेतील 2200 झाडे तीन टप्प्यात तोडण्यात येणार आहेत. खैर, सुबाभूळ अशी झाडे आहेत. पहिल्या टप्प्यात आवश्यक तेवढीच झाडे तोडण्यात येणार आहेत. अनेक झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. सहा वर्षानंतर महापालिकेच्या ताब्यात ही गायरान जागा आली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.