Pimpri News : महापालिका लसीकरण केंद्रांसाठी दोनशे कंत्राटी कर्मचारी नेमणार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाला अटकाव करण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरणासाठी सध्या 50 केंद्रे असून, त्यासाठी ठेकेदारी पद्धतीने 200 कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी ब्रिक्स इंडिया, क्रिस्टल या मनुष्यबळ पुरवठादार कंपन्यांना सुमारे 1 कोटी रुपये अदा केले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लसीकरण मोहिमेसाठी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. शहरात 50 नवीन केंद्रांची उभारणी आणि राज्य सरकारकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत दोन महिने कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार एका लसीकरण केंद्रासाठी 2 स्टाफ नर्स, 1 डाटा एन्ट्री ऑपरेटर, 1 वॉर्ड बॉय किंवा आया याप्रमाणे 50 कोरोना लसीकरण केंद्रांसाठी 200 कर्मचा-यांची नेमणूक करावी लागणार आहे.

कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याकरिता कोरोना लसीकरण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, रॅपिड अन्टिजेन, आरटीपीसीआर टेस्टिंग, वॉर रूम कामकाज, विलगीकरण कक्ष, नव्याने सुरू होणारे कोरोना केअर सेंटर तसेच इतर कामकाज करण्यासाठी विविध तांत्रिक संवर्गातील पदांची आवश्यकता आहे. वैद्यकीय विभागामार्फत लसीकरण केंद्राकरिता आवश्यक लागणारे 50 वैद्यकीय अधिकारी मानधन भरती प्रक्रियेअंतर्गत उपलब्ध करून देता येतील. परंतु, स्टाफनर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय किंवा आया या संवर्गातील 200 पदे नोंदणीकृत संस्थेमार्फत उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत.

राज्याच्या उद्योग विभागाच्या निर्णयानुसार, कामगार आयुक्त कार्यालयाअंतर्गत असणारी विविध कार्यालयांतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पदांची कामे बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्यासाठी दोन सेवापुरवठादारांचे पॅनल तयार करण्यात आले आहे.

ब्रिक्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन निविदाधारकांच्या पॅनलला तीन वर्षांकरिता मंजुरी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 50 स्टाफ नर्स, 25 डेटा एन्ट्री ऑपरेटर, 25 वॉर्ड बॉय, वॉर्ड आया असे एकूण 100 कुशल आणि अकुशल मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांसाठी प्रत्येकी 50 लाख 81 हजार 200रुपये अदा केले जाणार आहेत.  त्यानुसार, एकूण 1 कोटी 1 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चास मान्यतेचा प्रस्ताव महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीपुढे सादर केला आहे.

दरम्यान, महापालिकेमध्ये कार्यरत असलेले आणि करार पद्धतीने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी हे कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्या रुग्णसेवेकरिता पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस झालेल्या 32 इंटर्न विद्यार्थ्यांची क्षेत्रीय कार्यालयातील ‘वॉर रूम’च्या कामकाजाकरिता आणि ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करिता नेमणूक करण्यात आली आहे.

विद्यार्थी प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कोरोनाबाधित झालेल्या रुग्णाच्या संपकांतील नागरिकांचे कॉण्टंक्ट ट्रेसिंग करीत आहेत. केलेल्या कामाचा अहवाल समन्वयक अधिकारी डॉ. क्रिस्टोफर झेविअर यांच्याकडे सादर करत आहेत. या 32 शिकाऊ डॉक्टर्सना दररोज 300 रुपये मानधन अदा केले जात आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.