Pimpri news: गृह विलगीकरणातील रुग्णांना महापालिका 14 दिवस करणार फोन

2 कोटी 34 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) रुग्ण तसेच कोविडमुक्त रुग्णांना फोन कॉलद्वारे वैद्यकीय मदत देण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रतिदिन प्रतिरुग्ण 13 रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी थेट पध्दतीने कंत्राटदार नेमण्यात आला असून त्यावर 2 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीसमोर आयत्यावेळी सादर केला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. विविध रुग्णालयातील व्यवस्था अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या परंतु कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे घरगुती विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 21 हजार सकारात्मक रुग्णांचे घरगुती विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना रोगाच्या रुग्णवाढीचा वेग पाहता घरगुती विलगीकरण करण्यात येणा-या रुग्णांची लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आयुक्त राजेश पाटील यांनी वर्तविली आहे.

त्यांच्याशी संपर्काचे कोणतेही साधन महापालिकेकडे उपलब्ध नाही. सद्यस्थितीत घरगुती विलगीकरण केलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत आणि सल्ला देण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे कॉल सेंटरमार्फत  त्यांची दैनंदिन वैद्यकीय विचारपूस करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

त्यानुसार, घरगुती विलगीकरणातील रुग्णांना 14 दिवस दररोज एकदा दुरध्वनीवरुन संपर्क साधला जाणार आहे. त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरविणे, त्याबाबतची माहिती ’डॅश बोर्ड’वर उपलब्ध करणे तसेच कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांना देणे , आदी कामे कॉल सेंटर मार्फत केली जाणार आहे. घरगुती विलगीकरणातील रुग्णामध्ये जास्त जोखीम असणा-या रुग्णांचा देखील समावेश आहे.

घरगुती विलगीकरण केलेल्या रुग्णांचे शरीराचे तापमान ,हदयाची गती, झोपेची  गुणवत्ता, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यास अडचण अशा प्रकारची माहिती दिवसातुन एकदा दुरध्वनीवरुन विचारली जाणार आहे. त्यानुसार महापालिका रुग्णालय आणि कोविड सेंटर मार्फत  या रुग्णांवर उपचार केले जातील.

कोरोना बाधित रुग्ण आणि घरगुती विलगीकरण केलेले रुग्ण, जास्त जोखीम असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना तसेच कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांना कॉल सेंटर मधून फोन कॉलद्वारे आपल्याला सर्दी, ताप, पडसे, आहे का ? आपल्याला घशात खवखव, खोकला आहे का ? आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय का ? घरी ऑक्सिमीटर असल्यास त्यावर ऑक्सिजनचे रीडींग किती ? तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व्यवस्थित वेळेवर घेत आहात का ? तुम्हाला डॉक्टरांशी संवाद साधायचा आहे का ? आदी प्रश्न विचारले जाणार आहेत.

प्रश्नावली नकारात्मक आल्यावर वैद्यकीय मदतीची आवश्यकता असणा-या रुग्णाचा मोबाईल क्रमांक हा वैद्यकीय मदतीसाठी नियुक्त केलेल्या महापालिकेच्या अधिका-याकडे ’व्हाटस अ‍ॅप’ द्वारे पाठविण्यात येणार आहे.

रुग्णास रुग्णालयामध्ये दाखल करावयाचे आहे किंवा  नाही याबाबतदेखील वैद्यकीय अधिका-यांमार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. कॉल करण्याचे कामकाज थेट पध्दतीने ’मेसर्स ऑरनेट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ यांना देण्यात आले आहे. त्यासाठी प्रती कॉलचा दर सर्व करांसह 13 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे कामकाज 14 एप्रिल 21 पासुन सुरु झाले असून पुढील तीन महिन्यांसाठी आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात 20 हजार गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या आहे. त्यांना दररोज दुरध्वनीद्वारे कॉल करण्यासाठी 2 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.