Chinchwad News : प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका उभारणार पर्यावरणपूरक 13 मजली नवी इमारत

312 कोटींचे टेंडर प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मधील सात एकर जागेवर नवीन पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पूर्वी काढलेली 240 कोटी रुपयांची निविदा रद्द झाली. नवीन निविदा 66 कोटी रुपयांनी फुगली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे  तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर सातत्याने महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. तीन मजल्यावर अधिका-यांची दालने  तर, एका मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत.  सध्या कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे.

अनेक विभागांची कार्यालये मुख्यालयातून महापालिकेच्या इतर इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहेत. महापालिकेत वाहनतळ देखील पुरेसे नाही. अधिकारी, नगरसेवकांची वाहनेच पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते. महापालिकेचा नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. नोकर भरतीला मान्यता मिळाल्यास आणि कर्मचारी भरत्यानंतर पुन्हा जागेची कमरता भासणार आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

भाजपच्या सत्ताकाळात महिंद्र कंपनीच्या गांधीनगर- पिंपरी येथील जागेत इमारत बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठीच्या खर्चास महापालिका सर्वसाधारण सभेनेदेखील मान्यता दिली होती. इमारतीची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे आग्रही होते.

वास्तुविशारद ‘लॅण्डमार्क डिझाइन ग्रुप यांनी 17 डिसेंबर 2019 रोजी इमारतीचा विविध पर्यायांतील आराखडा तत्कालीन महापौर उषा ढोरे यांना सादर केला होता. 24 हजार 544 चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर त्यांनी नऊ मजली इमारतीचा आराखडा तयार केला. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम करण्याकामी अगोदर 200 कोटी खर्च अपेक्षित धरला होता; परंतु त्यामध्ये वाढ करीत खर्च 299 कोटी रुपयांवर पोहोचला. नऊमजली इमारत बांधण्याकामी 246 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्यानंतर निविदा रद्द करण्यात आली.

महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्यात महापालिकेच्या विविध विभागासह महापौर, पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर अशा सोयी असतील. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे.

भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या पर्यावरणपूरक इमारतोचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाचमजली स्वतंत्र इमारत वाहनतळासाठी असणार आहे. त्यात 500 मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत. तर, महापालिका सभागृहात (जीबी हॉल) तब्बल 300 नगरसेवकांच्या बसण्यासाठी आसनव्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅड असेल. या इमारतीचा संपूर्ण खर्च सुमारे 400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

इमारतीच्या बांधकामाचा आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, स्ट्रक्चरल डिझाइन, सखोल अंदाजपत्रक निविदांसंदर्भात आणि निविदापश्चात कामे करण्यासाठी सुनील पाटील असोसिएट्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड येथे ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, तारांगण हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. तसेच या मार्गावर ‘बीआरटी’चा प्रशस्त मार्ग आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.