Pimpri : महापालिका देणार 18 लाख रुपये ध्वजनिधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या वेतनातून कपात करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 18 लाख रुपयांचा ध्वजनिधी सुपूर्द केला जाणार आहे. माजी सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी राबविल्या जाणा-या विविध योजनांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. जुलै महिन्याच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात केली जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्याचे जिल्हाधिकारी हे जिल्हा सैनिक कार्यालयाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या कार्यालयाकडून महापालिका प्रशासनाशी 31 जानेवारी 2019 रोजी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 18 लाख रुपये ध्वजनिधी उपलब्ध करुन देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वर्ग एक ते चारमधील अधिकारी व कर्मचा-यांच्या जुलै महिन्याच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात केली जाणार आहे. वर्ग एक अधिका-यांच्या वेतनातून 500 रुपये, वर्ग दोन (मुख्याध्यापकांसह) 300 रुपये, वर्ग तीन(शिक्षकांसह)200 रुपये, वर्ग चार(सफाई कर्मचारी वगळून) 100 रुपये कपात केले जाणार आहेत.

देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणा-या सैनिकांची वीरमाता, वीरपत्नी, पिता व अपंग सैनिक यांच्या कुटुंबीयांना या ध्वजनिधीतून आर्थिक मदत केली जाते. याशिवाय माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी या निधीचा वापर केला जातो. त्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून हा निधी गोळा केला जातो. त्यानुसार महापालिकेकडे या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांच्या जुलै महिन्याच्या वेतनातून ही रक्कम कपात करण्यात येणार आहे. कपात केलेल्या निधीचा एकत्रित धनादेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कार्यालय, पुणे यांच्या नावाने तयार करुन तो प्रशासन विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.