Pimpri News : दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी महापालिका अडीच कोटी देणार

एमपीसी न्यूज – पुण्यात जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे.या इमारतीमध्ये रॅम्प, थेरपीसाठी लागणाऱ्या जागेसह सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका अडीच कोटींचा निधी देणार आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 28 जानेवारी रोजीच्या निर्णयानुसार, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पुण्यात जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील 400 चौरस मीटर जागा वापर करण्यास उपलब्ध करून दिली आहे.या जागेमध्ये इमारत बांधकामासाठी जिल्हा व्यवस्थापन मंडळाने मंजुरी दिलेली आहे.या योजनेच्या मूळ मार्गदर्शक तत्त्वानुसार व सुगम्य भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची इमारत ही सर्व दिव्यांगांना सुलभ व सुगम्य असणे बंधनकारक आहे. या इमारतीमध्ये तळमजल्याकरिता रॅम्प, सुगम्य शौचालय, थेरपीसाठी योग्य ती मोकळी जागा आणि सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांचा विचार केला गेला आहे.

या इमारतीच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्याकरिता जिल्हा परिषदेकडून 3 कोटी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.उर्वरित दुसऱ्या टप्प्याकरिता पुणे महापालिका आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेने प्रत्येकी 2 कोटी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी 28 मे 2022 रोजी बैठकीत दिले आहेत.जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व दिव्यांग व्यक्तींना लाभ होणार आहे. तसेच महापालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे. सद्य:स्थितीत समाज विकास विभागाकडे सन 2022-23 या आर्थिक वर्षात ‘दिव्यांग भवन’ या लेखाशिर्षावर 12 कोटी 70 लाख एवढी तरतूद उपलब्ध आहे. त्यानुसार महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी 2 कोटी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.