Pimpri News : महापालिका यंदा दिंडी प्रमुखांना भेट वस्तू देणार नाही

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळा जातो. महापालिकेच्या वतीने दोन्ही पालखीतील दिंडी प्रमुखांना गेल्या अनेक वर्षांपासून भेट वस्तू देण्याची प्रथा होती. मात्र, यंदा प्रशासकीय राजवटीत दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष पालखी सोहळा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा झाला. आता कोरोनाची तिसरी लाट कमालीची ओसरली असल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे 20 जून रोजी तर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे 21 जून रोजी प्रस्थान होणार आहे. यंदा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दोन्ही पालख्या शहारातूनच पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. या पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना महापालिकेच्या वतीने दरवर्षी भेटवस्तू देण्यात येत असते. यापूर्वी भेट वस्तुंमध्ये भ्रष्टाचार झाल्यावरून मोठे वादळ उठले होते.

यंदा आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रमुखांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यंदा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक यात सहभागी होतील अशी शक्‍यता आहे. सोयीसुविधा कमी पडू नये याची दक्षता प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी. दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्याऐवजी वृक्षारोपण करावे, पालखी सोबत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, फिरत्या शौचालयांची व्यवस्था यासह आदी सुविधा उत्तम दर्जाच्या द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका भेट वस्तू देणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्यातील दुसरा मुक्काम शहरातील आकुर्डी येथील श्री विठ्ठल-रूक्‍मिनी मंदिरात असतो. या भागात काय-काय सुविधा द्याव्या लागतील, स्थापत्य विषयक कामांसह आदी कामांचा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवार (दि.23) रोजी पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.