Pimpri News : पीसीएनटीडीएच्या जमिनीचे ‘सर्व्हेक्षण’ करुन महापालिका तयार करणार नकाशा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून (पीसीएनटीडीए) वर्ग करण्यात आलेल्या जमिनीचे सर्व्हेक्षण करुन नवा नकाशा पिंपरी-चिंचवड महापालिका तयार करणार आहे. त्यासाठी अहमदाबाद येथील एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनयमानुसार राज्य सरकारमार्फत 7 जून 2021 रोजीच्या अधिसुचनेनुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार, पीसीएनटीडीए विसर्जित करण्यात आले असून त्याचे कामकाज बंद करण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेस विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अधिसुचनेतील अटींनुसार, हस्तांतरणाची प्रक्रीया, सर्व चल, अचल मालमत्ता आणि दायित्वे, निधी व देय रकमा, पीसीएनटीडीएच्या ‘लँड डिस्पोजल पॉलीसी’ नुसार लिज रेंट, अतिरीक्त अधिमुल्य आदी सर्व शुल्कांची वसुली करणे, न्यायालयीन दाव्यांचे दायित्व, 12.5 टक्के परताव्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार, पीसीएनटीडीएच्या मालमत्ता पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे राहणार आहेत.

पीसीएनटीडीएचे 375.90 हेक्टर क्षेत्र पीएमआरडीएच्या ताब्यात दिले असून, उर्वरित क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. महापालिकेच्या ताब्यात आलेल्या जमिनीचे भूमापन करुन जमीन वापर नकाशा तयार करण्यात येणार आहे. त्या क्षेत्रासाठी महापालिका विकास योजना तयार करणार आहे. या कामासाठी एचसीपी या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.