Pune News : महापालिका करणार 4 लाख किटची खरेदी

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याकरीता आणि ‘सुपर स्प्रेडर’ शोधण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेली रॅपिड अँटीजेन टेस्टची मोहीम सोमवारपासून (दि.10) वेग घेणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासन रॅपिड अँटीजेन टेस्टची 4 लाख किट खरेदी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आठवडाभरापूर्वी शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 300 होती. आज ही संख्या 12 हजारांच्या घरात पोहोचली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकणार्‍या रुग्णांना शोधण्यासाठी महापालिकेने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सध्या ही मोहीम सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या प्रत्येक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. याशिवाय पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते, दुकानदार आणि दुकानातील कर्मचारी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी जाऊन रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी पथके तयार करण्याच्या सूचना पंधराही क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. एका क्षेत्रीय कार्यालयाने दररोज कमीत कमी शंभर नागरिकांच्या टेस्ट कराव्यात, जास्तीत जास्त कितीही टेस्ट कराव्यात, असे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

सध्या टेस्टची मोहिम सुरू असली तरी सोमवारपासून ही मोहीम वेग घेणार असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.