Pimpri News : घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका 4 ट्रान्सफर स्टेशन उभारणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी शहरात चार ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे (ट्रान्सफर स्टेशन) उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करून हूक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून 22 कोटी 20  लाख रूपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.

उद्योगनगरीत दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे 25  ते 30 ठिकाणी रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत.

हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील ब-याच भागातून गोळा करत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हवेचे प्रदुषणही होते. लिचेटची गळती रस्त्यावरून होते. तसेच दुर्गंधीचा त्रासही होतो. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. हे टाळ्ण्यासाठी महापालिका उपायुक्तांनी इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

महापालिका आयुक्तांच्या 17 सप्टेंबर 2021 रोजीच्या मान्य प्रस्तावानुसार कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, काळेवाडीतील एस. एम. कॉलेजसमोरील स्मशानभुमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर 23 – निगडीतील गायरान जागा, भोसरी-गवळीमाथा येथील कचरा स्थानांतर केंद्र या जागांपैकी चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. हे ट्रान्सफर स्टेशन उभारल्यामुळे त्या-त्या भागातील ओला व सुका कचरा छोट्या गाडीतून एकाच ठिकाणी गोळा होईल.

वर्गीकरणानुसार, ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करून हूक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल. इंधन बचत होईल. हवेचे प्रदूषण कमी होईल. लिचेटची गळती बंद होऊन ‘एमएसडब्ल्यू रूल 2016’ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

या ट्रान्सफर स्टेशनसाठी स्थापत्य विषयक कामे बीआरटीएस विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक यांत्रिकी व विद्युत विषयक कामे पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश दिले आहेत. त्यास अनुसरून प्रकल्प सल्लागार टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कामाअंतर्गत आवश्यक अभियांत्रिकी उपकरणे व विद्युत विषयक बाबींचे अंदाजपत्रक पीडब्ल्यूडी ची दरसुची व महापालिकेच्या मंजूर दरपृथ्थकरणानुसार बनविण्यात आले आहे.

चार ट्रान्सफर स्टेशनसाठी त्याचा भांडवली खर्च सुमारे 18 कोटी 65 लाख 15  हजार रूपये इतका येत आहे. जीएसटी, तातडीक कामांसाठीचे शुल्क आणि वर्क इस्टाब्लीशमेंट चार्जेस आदींसह एकत्रित अंदाजपत्रकीय खर्च 22 कोटी 20 लाख रूपये इतका होणार आहे.

महापालिकेच्या सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत अंदाजपत्रकीय रक्कम 50 कोटी आणि पाच कोटी रूपये इतकी तरतुद करण्यात आली आहे. या कामाच्या अंदाजपत्रकास 31 मार्च 2021 रोजी महापालिका सभेने मान्यता दिली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या 3 मे 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत ‘मिलियन प्लस सिटीज’ शहरातील पाणीपुरवठा व व्यवस्थापन सुधारणा तसेच प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी अनुदान मिळते. या अनुदानातून घेण्यात येणा-या कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत.

त्यानुसार, घनकचरा व्यवस्थापनासाठी चार ट्रान्सफर स्टेशन उभारण्याकरिता 22  कोटी 20 लाख रूपये रकमेस 15 व्या वित्त आयोगाच्या परिपत्रकानुसार प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच या कामाची तातडी व आवश्यकता लक्षात घेऊन अल्प कालावधीची निविदा नोटीस काढण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.