Pimpri News : महापालिका प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र सुरु करणार

एमपीसी न्यूज – स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरजू, होतकरू आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी  महानगरपालिकेच्या वतीने प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा  मानस आहे. यासंदर्भात ठाणे येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली.

ठाणे येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे नव्याने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने या इमारतीमधील व्यवस्था, सोयीसुविधा आणि संरचना आदींची पाहणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप, समन्वयक गिरीष झेंडे, व्याख्याते अरुणराज जाधव, कौस्तुभ बोंद्रे, व्याख्यात्या अमिषा मायावी आदींचा समावेश होता.

यानंतर शिष्टमंडळाने महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या समवेत नवीन  प्रशासकीय प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीबाबत विस्तृतपणे चर्चा केली.  पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या चर्चेवेळी क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा विभागाचे राजेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते.

विकास ढाकणे यावेळी म्हणाले, सध्या महापलिकेच्या वतीने विविध भागात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले आहेत, तेथे अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. शहरातील गरजू, होतकरू आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता, गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे सामर्थ्य असूनही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यापासून वंचित राहतात.

अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळविण्याच्या प्रयत्नांना बळ देता यावे आणि स्पर्धा परीक्षांद्वारे त्यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जावे यासाठी मनपा हद्दीत प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक विविध विषयांबाबत  तज्ञांचे मार्गदर्शन करण्याची सोय उपलब्ध असेल. शिवाय आवश्यक पुस्तके देखील येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या केंद्रामध्ये कोणकोणत्या सोयी असाव्यात, प्रवेश प्रक्रिया कशी असावी, रचना कशी असावी आदींबद्दल शिष्टमंडळाने मार्गदर्शन आणि सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.