Pimpri News: करवाढ, दरवाढ नाही; महापालिकेचा 7112 कोटींचा अर्थसंकल्प ‘स्थायी’पुढे सादर

एमपीसी न्यूज – कोणतीही करवाढ, दरवाढ, पाणीपट्टी वाढ नसलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) स्थायी समितीला सादर केला. अखेरची शिल्लक 196 कोटी 91 लाख दाखविण्यात आली आहे.

सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

महापालिकेचा हा 39 वा अर्थसंकल्प आहे. तर, नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी ही विशेष सभा 24 फेब्रुवारी 2021 दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात जमा बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) करातून 301 कोटी 50 लाखाचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. जीएसटीपोटी 1898 कोटी 12 लाख अनुदान मिळेल असे ग्रहित धरले आहे. मालमत्ता करातून 950 कोटी, गुंतवणूकीवरील व्याजातून 193 कोटी 50 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

पाणीपट्टीतून 94 कोटी 82 लाख, बांधकाम परवाना विभागातून 520 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तर, आरंभिची शिल्लक 625 कोटी 11 लाख दाखविण्यात आली आहे.

तर, खर्चाच्या बाजूला सामान्य प्रशासन विभागावर 365 कोटी 93 लाख, शहर रचना व नियोजन 94 कोटी 32 लाख, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्य 2381 कोटी लाख, वैद्यकीय 102 कोटी, आरोग्य 107 कोटी 8 लाख , शिक्षण 222 कोटी 5 लाख, उद्यान व पर्यावरण 142 कोटी, इतर विभाग 605 कोटी 49 लाख, पाणीपुरवठा भांडवली खर्चासाठी 437 कोटी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या विकासकामासाठी 1630.74 कोटी रकमेची तरतूद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी 58 कोटी, क्रीडासाठी 67 कोटी 60 लाख, महिलांसाठी 53 कोटी 37 लाख, दिव्यांगासाठी 38 कोटी 56 लाख आणि भूसंपादनासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये!
# महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी 1630 कोटी 73 लाख
# क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी 331 कोटी 53 लाख
# नाविन्यपूर्ण योजना हा लेखशीर्षावर 1232 कोटी 34 लाख
# शहरी गरिबांसाठी तरतूद 1214 कोटी 29 लाख
#महापौर विकासनिधी तरतूद 8 कोटी 55 लाख
# महिलांच्या विविध योजनासाठी तरतूद 53 कोटी 37 लाख
# दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद 38 कोटी 56 लाख
# पाणी पुरवठा विशेष निधी 250 कोटी
# पीएमपीएलसाठीची तरतूद 238 कोटी 21 लाख
# नगररचना भू संपादनासाठी तरतूद 150 कोटी
# अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता 4 कोटी
# स्वच्छ भारत मिशनसाठी 1 कोटी
# स्मार्ट सिटी तरतूद 100 कोटी
# प्रधानमंत्री आवास योजना तरतूद 49 कोटी
#अमृत योजना तरतूद 63 कोटी 83 लाखाची तरतूद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.