Pimpri News: महापालिकेची ‘चाईल्ड हेल्पलाईन’ आजपासून बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 5 जुलै पासून  लहान मुलांसाठी सुरू केलेली  चाईल्ड हेल्पलाईन आजपासून बंद  करण्यात आली. सण / उत्सवाच्या कालावधीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात हेल्पलाईन स्थगित करण्यात आल्याचे हेल्पलाईनचे समन्वयक, उपअभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर  महापालिकेच्या वतीने  लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात आली होती. शहरातील लहान मुलांना कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती मिळावी, त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर व्हावी या उद्देशाने लहान मुलांकरीता शालेय विद्यार्थ्यांमार्फत संचालन होणारी चाईल्ड हेल्पलाईन 5 जुलै 21 पासून सुरु करण्यात आली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून लहान मुलांच्या कोरोना विषयक शंकांचे निरसन होण्यास मदत होत होती. निगडीतील अस्तित्व मॉल येथील स्मार्ट सिटीच्या कंट्रोल अॅण्ड कमांड सेंटरमधून हेल्पलाईनचे काम चालते.

हेल्प लाईनच्या माध्यमातून 205 कॉल्स प्राप्त झालेले असून 45 दिवसामध्ये सरासरी 5 कॉल्स प्रतिदिनी येत होते. चाईल्ड हेल्पलाईन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या समवेत 8 सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यात 10 सप्टेंबर पासून हेल्पलाईन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचे सुचविण्यात आले.  सध्या केंद्र व राज्य शासनाने कोरोना 19 विषयक नियम ब-याच प्रमाणात शिथिल केले आहेत. तसेच गौरी गणपती, नवरात्र व दिपावली यासारखे सण येत आहेत. या सणांमध्ये / उत्सवामध्ये मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. तसेच जास्तीत-जास्त शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी असते. त्यामुळे हेल्प लाईनवर येणारी प्रश्नांची संख्या अत्यल्प असणार आहे.

 तथापि, त्यासाठी विद्यार्थांना हेल्प लाईन सेंटर मध्ये यावे लागणार आहे. उत्सवाचे / सणांचे दिवस पाहता विद्यार्थी येण्यास अथवा पालक / शिक्षक विद्यार्थ्यांना पाठविण्यास अडचण येईल. त्यामुळे चाईल्ड हेल्प लाईन सण / उत्सवाचे कालावधीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करणे उचित होईल. भविष्यात कोरोनाच्या तिस-या लाटेच्या विचार करुन चाईल्ड हेल्प लाईन पुनःश्च चालू करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.  आजपासून पुढील सुचनेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात चाईल्ड हेल्पलाईन बंद राहणार असल्याचे हेल्पलाईनचे समन्वयक, उपअभियंता विजय भोजने यांनी  सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.