Pune News : समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य : महापौर मोहोळ

३५० कोटींच्या प्रकल्पाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज : ‘समाविष्ट गावांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध असून त्यातीलच महत्त्वाचा भाग असणाऱ्या मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत समाविष्ट ११ गावांसाठी मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प साकारण्यात येत असून समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा सक्षमपणे उभ्या करण्यास महापालिकेचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

महापौर मोहोळ यांच्या हस्ते नऱ्हे येथे ३५० कोटींच्या मलवाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी महापौर मोहोळ बोलत होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, खडकवासल्याचे आमदार श्री. भीमरावअण्णा लतापकीर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या अश्विनी पोकळे, गणेश ढोरे, हरिदास चरवड, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे बोलताना म्हणाले, ‘समाविष्ट ११ गावांमध्ये शिवणे, संपूर्ण उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), लोहगाव आदी गावांचा समावेश असून मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन या सर्व गावांसाठी महत्त्वाचा भाग ठरणार आहे’

‘समाविष्ट गावांसाठीची ही कामे ४ वर्षात राबवण्याचे नियोजन केले असून या अंतर्गत ११ गावांमध्ये १८२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेचा आणि मांजरी बुद्रुक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचा असे दोन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहेत. यात मांजरी प्रकल्पास देवाची उरुळी, उंड्री, फुरसुंगी, मांजरी तर मुंढवा प्रकल्पास केशवनगर, साडेसतरा नळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

‘समाविष्ट गावांचा विकास करताना तो नियोजनबद्ध आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊनच करत आहोत. म्हणूनच मलनिसरण व्यवस्थेचा आधी मास्टर प्लॅन तयार केला गेला आहे. सदरील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचेदेखील नियोजन केले आहे. या मास्टर प्लॅनमधील कामांना ‘७२ ब’ अंतर्गत मान्यताही दिली आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.