एमपीसी न्यूज – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारुप कच्चा आराखडा तयार करण्याकरिता आयुक्त राजेश पाटील यांनी 25 सदस्यांची समिती गठित केली आहे.
त्यामध्ये उपसंचालक, नगर रचनाकार, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरेखक, कॉम्प्युटर ऑपरेटर यांचा समावेश आहे. हे अधिकारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग रचना तयार करणार आहेत. या समितीत कोण असणार याकडे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांचे लक्ष लागले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेस प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या होत्या. त्यानुसार आयुक्त पाटील यांनी कच्चा आराखडा तयार करण्यासाठी 25 जणांची समिती गठीत केली आहे.
यांचा आहे समावेश
त्यात नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे, नगररचनाकार प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, बापू गायकवाड, उपअभियंता चंद्रकांत मुठाळ, सुनील अहिरे, सोहन निकम, कनिष्ठ अभियंता प्रवीण धुमाळ, अश्लेश चव्हाण, प्रसाद देशमुख, चंद्रकांत कुंभार, किरण सगर, विकास घारे, हेमंत घोड, स्वप्नील शिर्के, आरेखक नवनीत ढावरे, शमीर पटेल, रुपाली निकम आणि कॉप्युटर ऑपरेटर सचिन राणे या 25 जणांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
नियमांचे काटेकोर पालन व्हावे
या अधिकारी, कर्मचा-यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबतचे कामकाज करावे. प्रभाग रचना करताना त्याची गोपनियता राखणे, नियमांचे काटेकोर पालन करुन प्रारुप प्रभाग रचनेचे कामकाज वेळेत पूर्ण होईल याची खबरदारी घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रामधील सर्व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कच्चा आराखडा तयार होताच तसे आयोगाला तत्काळ ई-मेलद्वारे अवगत करावे. हे सर्व कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करावे, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
अशी होणार प्रभाग रचना
प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकडी त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही. याची दक्षता घ्यावी. मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हेनंबर यांचे उल्लेख यावेत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.