Pimpri News: महापालिका अग्निशमन, सुरक्षा कर्मचा-यांना शनिवारसाठी दीडपट भत्ता मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अग्निशमन, सुरक्षा कर्मचा-यांना शनिवारसाठी दीडपट भत्ता मिळणार आहे. अग्निशामक विभागातील 106 कर्मचा-यांना तसेच सुरक्षा विभागातील सन 1991 पासूनच्या सर्व कर्मचा-यांना महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारचा अतिकालीन भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागातील 83 कर्मचा-यांनी पिंपरी येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयात महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारचा अतिकालीन भत्ता मिळावा, याकरिता दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल न्यायालयाने 9 जुलै 2014  रोजी दिला. या निकालामध्ये न्यायालयाने सर्व बाबींचा अभ्यास करून कामगारांना महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी काम केल्याबाबत दीडपटीने अतिरिक्त भत्ता देण्याबाबत आदेश दिला आहे. त्यानंतर अग्निशामक विभागातील कर्मचा-यांना त्यांच्या पगराच्या दीडपट अतिकालीन भत्ता दिला आहे.

त्या अनुषंगाने अग्निशामक विभागातील उर्वरीत 106 कर्मचा-यांनी पुणे औद्योगिक न्यायालयात अतिकालीन भत्ता मिळावा, यासाठी तक्रार अर्ज केले होते. न्यायालयाने त्यांना अतिकालीन भत्ता देण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच 18 फेब्रुवारी 2009 रोजी प्रशासन विभागाकडील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचा-यांना अतिकालीन भत्ता देय असल्याचे अटीमध्ये नमुद केले आहे. सुरक्षा विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने अग्निशामक विभागातील उर्वरीत सर्व कर्मचा-यांना तसेच सुरक्षा विभागातील सन 1991 पासूनच्या सर्व कर्मचा-यांना महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारचा अतिकालीन भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येणार आहे. या प्रस्तावास महापालिका सभेने उपसुचनेद्वारे मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.