Pimpri : ‘यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेमुळे महापालिकेची प्रतिमा खराब, निविदा रद्द करा’

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना पत्र  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 742 कोटी रुपयांच्या निविदेला सहावेळा मुदतवाढ देऊनही प्रत्येक कामासाठी पाच ते सहाच निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदा प्रसिद्ध केल्यापासून आणि उघडल्यानंतर अनेकवाद, विवाद, आंदोलने झाल्याने महापालिकेची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे या निविदेची कार्यवाही तत्काळ बंद करुन निविदा रद्द करण्यात यावी, अशी सूचना  सत्ताधारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना केली आहे. तसेच 2020-21 मध्ये रस्तेसफाईच्या कामकाजासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री महापालिकेने खरेदी करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670  किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी एक संयुक्त निविदा न काढता सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्याची शिफारस सल्लागाराने केली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सल्लागाराच्या शिफारशींमध्ये फेरबदल केले. सुधारित निविदेची रक्कम 646  कोटी 53  लाख ऐवढी करत वाहनांची संख्या 51 आणि कामगारांची संख्या 706  निश्चित केली.  तांत्रिक छाननीमध्ये  6 पॅकेजसा’ठी 6 कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले. निविदेतील घोळ, बदललेल्या अटी – शर्ती, निविदेला वारंवार दिलेली मुदतवाढ यामुळे महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार पैशांची लूट करत करत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली होती.

आता तब्बल वीस दिवसानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. जगताप यांनी पत्रात म्हटले आहे, सहावेळा मुदतवाढ देऊन प्रत्येक कामासाठी केवळ पाच ते सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदेचा लिफाफा उघडण्यात आला असून पात्र, अपात्र कार्यवाही आरोग्य विभागाकडून चालू आहे.  या निविदेबाबत बातम्या येत असून आपल्याकडे देखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कामगार संघटनांनी आंदोलन केले. निविदा प्रसिद्ध केल्यापासून आणि उघडल्यानंतर अनेकवाद, विवाद, आंदोलने झाल्याने महापालिकेची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे या निविदेची कार्यवाही तत्काळ बंद करुन निविदा रद्द करण्यात यावी.

यापुढे सन 2020-21 मध्ये रस्तेसफाईच्या कामकाजासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री महापालिकेने खरेदी करावी. त्यासाठी अंदाजपत्रकात योग्य ती तरतूद करावी. रोड स्वीपर चालविण्याचे प्रशिक्षण महापालिका कर्मचा-यांना द्यावे. महापालिकेच्या कर्मचा-यांमार्फतच रोड स्विपिंगचे कामकाज करण्यात यावे. जेणेकरुन महापालिकेच्या आर्थिक बचतीबरोबर शहरातील रस्त्यांची स्वच्छता आणि कर्मचा-यांचे हित जपले जाईल. त्यामुळे ही निविदा त्वरित रद्द करावी अशी सूचना आमदार जगताप यांनी आयुक्तांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.