_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा विकसित करणार

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 प्राथमिक शाळा प्रायोगिकतत्वावर विकसित केल्या जात आहेत. आता महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्याबाबतचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच पाचवी ते दहावी आणि उर्दू माध्यमाच्या तिसरी ते चौथीतील विद्यार्थीनींकरिता प्रत्येकी दोन शालेय जॅकेट देण्यात येणार आहेत. याबाबतच्या ठरावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील 13 प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत प्रायोगिक तत्वावर अद्यावत केल्या जात आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरुम बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. महापालिका शाळेच्या पटसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा स्मार्ट सिटी अंतर्गत अद्यावत कराव्यात. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, शारीरिक, शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होईल. शाळेच्या पटसंख्येतही वाढ होईल.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना शालेय हाफ जॅकेट देण्यात येणार आहे. पाचवी ते दहावी आणि उर्दू माध्यमाच्या तिसरी ते चौथीतील विद्यार्थीनींकरिता प्रत्येकी दोन शालेय जॅकेट देण्यात येणार आहेत. जॅकेटचा पुरवठा करण्यास महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने सहमती दर्शविली आहे. त्यासाठी अंदाजे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हाफ जॅकेट, हेयर ब्रांड, रेबीन  महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला शिक्षण समितीने मान्यता दिली आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेच्या धर्तीवर नेवाळे वस्तीमधील प्राथमिक शाळा क्रमांक 88 मध्ये प्रायोगिक तत्वावर स्पार्कस क्लासमार्फत हस्ताक्षर सुधारणा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्राथिमक शिक्षण विभागाअंतर्गत येणा-या सर्व बालवाडीतील विद्यार्थ्यांकरिता ई-लर्निंग संच पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही लहानपणापासून शिक्षणाची ओढ निर्माण होईल. बालवाडीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल, असा विश्वास शिक्षण समितीने व्यक्त केला आहे. ई-लर्निंग संचमध्ये महाराष्ट्र सरकारच्या बालभारती पाठ्यपुस्तकाच्या आधारे अभ्यासक्रम शिकविला जात आहे.

महापालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या दालनामध्ये, संगणक कक्ष, ग्रंथालयातील खिडक्यांना पडदे नाहीत. त्यामुळे आतमध्ये प्रकाश, धूळ येत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार शाळेत खिडक्यांना पडदे बसविण्यात यावे, असा ठरावही शिक्षण समितीने मंजूर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.