Pimpri : महापालिका शाळेतील शिक्षकांना आता ‘युनिफॉर्म’

शिक्षण समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळेत इतर कामासाठी बाहेर जातात. असे प्रकार रोखण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता शिक्षकांना ‘युनिफॉर्म’ (गणवेश) आवश्यक केला आहे. महापालिका शाळेत 1174 शिक्षक कार्यरत आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका शिक्षण समितीची पाक्षिक सभा आज पार पडली. मनिषा पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविल्या जातात. प्राथमिक विभागाच्या 105 आणि माध्यमिक विभागाच्या 18 अशा एकूण  123 शाळा आहेत. तर,  1174 शिक्षक आहेत.

महापालिका शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळेत इतर कामासाठी बाहेर जातात. असा प्रकार रोखण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महापालिका शाळेतील शिक्षकांना खासगी शाळेतील शिक्षकांप्रमाणे ‘युनिफॉर्म’ (गणवेश) आवश्यक केला आहे. यामुळे शिस्तीचे वातावरण निर्माण होईल. शिक्षक शालेय वेळेमध्ये इतरत्र जाण्यास आळा बसेल, असे शिक्षण समितीच्या याबाबतच्या ठरावात म्हटले आहे. हा युनिफॉर्म कसा असावा. त्यांचा रंग कसा असावा, याबाबत पदाधिका-यांशी चर्चा केली जाईल.  त्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे यांनी सांगितले.

महापालिका शाळांना थोर पुरुषांची नावे

शिक्षण समितीच्या सदस्यांनी नुकताच प्राथमिक शाळांचा पाहणी दौरा केला होता. अनेक शाळांना नावे देण्यात आली नसल्याचे दिसून आले.  शाळांना त्यांच्या जवळच्या परिसरावरुन संबोधले जात आहे. त्यामुळे अद्यापही नावे दिली नसलेल्या शाळांना थोर महापुरुष किंवा राष्ट्रीय खेळांडूची नावे देण्यात यावीत, असा ठरावही मंजूर केला.

सफाई कामगारांना किमान वेतन द्या

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मानधनावर सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यांना केवळ दोन हजार रुपये तुटपुंजे मानधन मिळत आहे. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये दोन हजार रुपयांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे. त्यामुळे सफाई कामगारांना शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात यावे. याबाबतचा ठराव देखील समितीने आयत्यावेळी मंजूर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.