Pune : पालिका शाळांमध्ये मिळणार अत्याधुनिक पद्धतीने पोषण आहार

एमपीसी न्यूज – महापालिका शाळांमध्ये पुरवठा करणाऱ्या पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक आणि पदाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी तक्रारी आल्याने बचत गटांना हे काम देण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांना हे काम देण्याचा विचार सरकारतर्फेच करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अत्याधुनिक पद्धतीने पोषण आहार मिळणार आहे.
पोषण आहार पुरवठ्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर “अक्षयपात्र’ या स्वयंसेवी संस्थेला पोषण आहार देण्याचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांना पुरेसा आहार न देणे, भातामध्ये धान्यादी आणि भाजीपाल्याचे प्रमाण कमी असणे, ठरवून दिलेल्या मेनूनुसार आहार न देणे, विहित उष्माकांचा दर्जेदार आहार न देणे, आहार वाटपाचे काम विद्यार्थ्यांना करायला लावणे, बचतगटांमधील सदस्यांव्यतिरिक्त इतर महिलांनी आहार शिजविणे, तसेच स्वयंपाकघर अस्वच्छ असणे, पाण्याची साठवणूक अस्वच्छ भांड्यात करणे अशा तक्रारी बचतगटांच्या बाबतीत केल्या गेल्या होत्या.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आरोग्यदायी आणि गरम आहाराचा पुरवठा करणे गरजेचे असल्याने तशा आहाराचा पुरवठा करणाऱ्या शिवाय त्यांच्या स्वतःच्या निधीतून (सीएसआर, पब्लिक डोनेशन) आहाराची गुणवत्ता वाढवून चांगला आहार देणाऱ्या “अक्षयपात्र’, “अन्नामृत’ यासारख्या स्वयंसेवी संस्थांची माहिती घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.