Pimpri : महापालिका कचरा कंत्राटदारावर मेहरबान; 50 गाड्या, 50 चालक दिले मोफत 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या करारनाम्यातील अटी-शर्ती कंत्राटदाराच्या हिताच्या असतानाच महापालिकेने त्यावर आज मेहरनजर केली आहे. चिंचवड, रहाटणी, थेरगाव, वाकड, पिंपळेसौदागर, सांगवी या दाट लोकवस्तीच्या भागात कचरा समस्या उग्र असल्याचे दाखवत महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या 50 गाड्या आणि 50 चालक मोफत कंत्राटदाराला दिले आहेत. सत्ताधारी भाजप, आयुक्त श्रावण हर्डीकर कंत्राटदारावर इतके फिदा का झाले आहेत? याबाबतचा संशय बळावला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहराचे दोन भाग करत उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.

नवीन कामाला सुरुवात होऊन दहा दिवस उलटले तरी शहरातील कचरा कोंडी कमी झाली नाही. या कचरा कोंडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य मयुर कलाटे, पंकज भालेकर यांनी आज (मंगळवारी) स्थायी समितीच्या सभागृहाबाहेरच कचरा फेकला. तर, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकला. भाजपच्या पक्षाच्या बैठकीत देखील कचराकोंडीचे पडसाद उमटले. अनेक नगरसेवकांनी कचरा उचलला जात नसल्याची व्यथा शहराध्यक्षांसमोर मांडली. दरम्यान, कचरा कोंडीचा निषेध करत आजची स्थायी समितीची साप्ताहिक सभा शुक्रवार (दि. 12) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंत्राटदार करत असलेल्या दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन या कामाच्या अनेक तक्रारी आहेत. ‘अ’, ‘ब’, ‘ग’, ‘ड’ आणि ‘ह’ परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए.जी. एन्वायरोकडे यांच्याकडे आहे. या परिसरातील घरोघरचा कचरा संकलित केला जात नाही. कच-याच्या मोठ्या समस्या आहेत.

याबाबत बोलताना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, ”दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन करणा-या ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदाराकडे वाहनांची संख्या कमी आहे. आता 58 गाड्या आहेत. 15 कॉम्पॅक्टर असून त्याच्या माध्यमातून केवळ मोठ्या ठिकाणाचा कचरा उचलला जात आहे. त्यामुळे कचरा संकलन करण्यासाठी 23 गाड्या वाढविण्याचे कंत्राटदाराने मान्य केले आहे. 407 टेम्पो सात आवश्यक असून सहा उपलब्ध आहेत. एक कमी आहे. वाहतूक करणा-या नऊ गाड्या आल्या असून तीन बाकी आहेत”.

”डंपर पाच आवश्यक असून तीन आले. तर, दोन बाकी आहेत. त्यामुळे कचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या कंत्राटदाराला 50 गाड्या आणि 50 चालक दोन महिन्यासाठी मोफत दिले आहेत. यापूर्वी कचरा संकलन आणि वहनासाठी 131 गाड्या होत्या. तर, 174 कचरा कुंड्या होत्या”, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.