Chinchwad News : दत्तनगर येथे तोडफोड करणाऱ्या टोळक्‍यावर खुनी हल्ला आणि दरोड्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दत्तनगर, चिंचवड परिसरात एका टोळक्याने तोडफोड करून दहशत निर्माण केली. ही घटना मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास घडली. या टोळक्‍यावर दरोडा आणि खुनी हल्ला असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राहूल कांबळे, मुकुल कांबळे, सोन्या कांबळे, सुशांत ऊर्फ दाद्या शिंदे, मोहसीन शेख, स्वप्नील कांबळे, हृषीकेश महारनोर, नवनाथ शिंदे, सोहम सरोदे, सुजल सूर्यवंशी, यश गरड, राहुल कसबे, सौरभ भालेराव, ओंकार शिंदे, नीलेश उजगरे, राजूल शेलार आणि इतर (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यात प्रशांत रघुनाथ टकले (वय 23, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून हातात कोयते, सिमेंटचे गट्टू, फरशीचे तुकडे घेऊन आरडा ओरडा करीत आले. आम्हाला सर्वांनी दादा म्हणायच. कोणाची हिम्मत असेल तर आमच्या समोर येऊन दाखवा, त्याचा मुडदाच पाडतो, असे म्हणून हातातील हत्यारे फिरवत दहशत निर्माण केली. गल्लीतील लोकांच्या दारासमोर असलेल्या प्लास्टीक ड्रमवर कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारून तोडफोड केली.

त्यांच्या दहशतीला घाबरून लोकांनी दरवाजे खिडक्‍या बंद केल्या. त्यावेळी फिर्यादी टकले घराबाहेर उभे असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. टकले यांना शिवीगाळ करीत तू बाहेर थांबतोय का, थांब तुला खल्लासच करून टाकतो, असे म्हणत टकले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मानेवर कोयता मारला. मात्र त्यांनी खाली वाकून तो वार चुकविल्याने कोयता घराच्या दरवाजावर बसला.

वरील आरोपींवर दुसरा गुन्हा दरोड्याचा दाखल करण्यात आला आहे. आदेश परशुराम शिंदे (वय 19, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घराबाहेर उभे असताना आरोपी आपसांत संगनमत करून आरडा ओरडा करीत तिथे आले. शिवीगाळ करीत आमच्या भावावर गुन्हे दाखल करताय काय, आता कोणात दम असेल तर बाहेर या.

एकाएकाला रस्त्यात आडवा पाडून उभा चिरतो, असे म्हणत लोकांच्या घराबाहेर ठेवलेल्या ड्रमवर कोयते मारून नुकसान केले. आरोपींनी फिर्यादी शिंदे यांना खाली पाडून मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.