Kondhwa crime news: कोंढव्यात खळबळ ! किराणा सामान उधार न दिल्याच्या रागातून दुकानमालकावर खुनी हल्ला

Murder attack on shop owner out of anger over not lending groceries.

एमपीसी न्यूज- पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ किराणा सामान उधार न दिल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने दुकान मालकावर कोयत्याने खूनी हल्ला चढवला. आरोपी टोळके इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी त्याच्या खिशातून साडेआठ हजारांची रोख रक्कम काढून पळ काढला. 

कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आशीकेत मारुती कचरे (वय 23)यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे कोंढवा बुद्रुक परिसरात किराणा सामानाचे दुकान आहे. आरोपी सामान आणण्यासाठी दुकानात गेले होते. यावेळी फिर्यादीने त्यांना किराणा सामान उधार देण्यास विरोध केला. याचा राग आरोपींच्या मनात होता.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी आरोपी कोंढव्यातील कान्हा हॉटेल चौकातून जात असताना आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या खिशातून साडेआठ हजार रुपये काढून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.