Pune News : पान टपरीवरील उधारीच्या पैशाच्या वादातून खून

एमपीसी न्यूज  : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. पान टपरीवरील उधारीच्या पैशातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला. कोयत्याने आणि पाईपने निर्घुणपणे मारहाण करत हा खून करण्यात आला. अजय शिवाजी शिंदे (वय 23)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हवेली पोलिस स्टेशनमध्ये मयताचा मावस भाऊ राकेश तुळशीराम जाधव (वय 24) फिर्याद दिली आहे. आठ जणांविरुद्ध याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अजय शिंदे आणि आरोपी राहुल सपकाळ यांच्यात पानटपरी च्या उधारी वरून वाद होते. गुरुवारी रात्री या दोघांमध्ये नांदेड परिसरात या उधारी वरून बाचाबाची झाली.  त्यानंतर आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांनी कोयत्याने आणि लोखंडी पाईपने मारहाण करत घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अजय शिंदे याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

हवेली पोलिसांनी या प्रकरणी राहुल सपकाळ रोहित सपकाळ यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तनात करण्यात आली आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.