Dehuroad : दारू पिताना झालेल्या भांडणातून सहकारी कामगाराचा खून; गुन्हे शाखेकडून अवघ्या चार तासात गुन्ह्याची उकल

Murder of a co-worker over a drinking dispute

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे गाथा मंदिराच्या मागे एका अनोळखी व्यक्तीचा पोत्यात मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कुजला असल्याने त्याची ओळख पटवणे आणि एकंदरीत गुन्ह्याचा तपास लावणे, हे पोलिसांची डोकेदुखी वाढवणारे काम होते. मात्र पिंपरी चिंचवड गुन्हा शाखेच्या युनिट पाचने अवघ्या चार तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून तिघांना अटक केली. दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणातून हा खून केल्याचे आरोपींनी सांगितले आहे.

अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे (वय 19, रा. इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे. मूळ रा. मु.पो. उमरखेड, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), पवन किसन बोरोले (वय 26, रा. इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे. मूळ रा. आटमोडी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), महेंद्र विजय माने (वय 38, रा. इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे. मूळ रा. गवळीनगर, गावडे चाळ, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांचा चौथा साथीदार सचिन (पूर्ण नाव माहिती नाही. रा. देहूगाव) याचा पोलीस शोध घेत आहेत.

सुनिल रामराव मरजकोले (वय 35, रा. अंतरगाव पालुटी, कळंब, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी देहूगावात गाथा मंदिराच्या मागे इंद्रायणी नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला.

हा प्रकार खुनाचा असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून आपली तापसचक्रे फिरवली. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, युनिट पाच करीत होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे आणि पोलीस नाईक दत्तात्रय बनसुडे यांना मृतदेहाबाबत माहिती मिळाली.

हा मृतदेह सुनील नावाच्या कामगाराचा असून तो इंद्रायणी नदीचे कडेला शेतामध्ये राहत असतो. त्यानुसार मृतदेहाची ओळख पटवून पुढील तपास सुरू झाला.

सुनील हे टायगर, पवन, महेंद्र आणि आणखी एका व्यक्तीसोबत राहत असल्याची महिती पोलिसांना मिळाली. सुनील यांच्या सहकाऱ्यांची माहिती काढून सांगुर्डी फाटा येथून टायगर, पवन, महेंद्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला. तिन्ही आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता टायगर याने गुन्ह्याची कबुली दिली.

हा गुन्हा टायगर याने पवन, महेंद्र, सचिन यांच्या मदतीने केल्याचे त्याने सांगितले. 14 मे रोजी दुपारी मयत सुनील, आरोपी टायगर, पवन, महेंद्र आणि सचिन हे दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.

त्या रागातून 15 मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी सुनील यांना लाथाबुक्यांनी तोंडावर पंच मारून तसेच डोक्यात दगड घालून ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीलचे हातपाय बांधून मृतदेह पोत्यात टाकून त्यात दगड टाकून मृतदेहाचे पोते इंद्रायणी नदीत टाकून दिले.

पोलीस चौथा आरोपी सचिन याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, फारुक मुल्ला, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे, सावण राठोड, गणेश मालुसरे, नितीन बहिरट, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.