Pune News : पुण्याच्या हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरातील फुरसुंगी मध्ये एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने तोंडावर व डोक्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. मंगेश किशोर शिंगाडे (वय 26)-असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू विष्णू शिंगाडे यांनी तक्रार दिली आहे. फुरसुंगी येथील भेकराई बस डेपो शेजारील मल्टीपर्पज हॉलच्या समोर हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश शिंगाडे हा सराईत गुन्हेगार आहे. सोमवारी सायंकाळी तो फुरसुंगी येथील भेकराईनगर या ठिकाणी आला असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. डोक्यावर कोयत्याने वार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेशचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.