Chakan : अल्पवयीन मुलीचा खून प्रकरण; दक्षिणात्य चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून अल्पवयीन मुलाने केला खून

Murder of minor girl by minor boy after watching southern movies, crime patrol series.भारुडाच्या कार्यक्रमात 'तो' स्त्री पात्र करायचा; 'ती' त्याला हिजडा म्हणाली म्हणून सलत होती जखम

एमपीसी न्यूज – चाकण जवळ थोपटवाडी करंजविहीरे गावात घडलेले अल्पवयीन मुलीच्या खुनाचे प्रकरण नवीन वळणावर आले आहे. पोलिसांनी अटक केलेले संशयित आरोपी हे मुख्य आरोपी नसून त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे समोर आले आहे. नात्याने भाचा असलेल्या एका अल्पवयीन मुलानेच ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी अल्पवयीन मुलगा भारुडाच्या कार्यक्रमात स्त्री पात्र करायचा. त्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनात देखील स्त्री पात्राचा प्रभाव वाढू लागला होता.

दरम्यान, ‘त्या’ मुलीने त्याला एकदा हिजडा असे म्हटले. तसेच ‘काय हिजड्यासारखा काय वागतो. हिजडया सारखे काय हसतो’ असे म्हणून काही वेळेला हिणवले होते. ही गोष्ट त्याच्या मनात सल करत होती. त्यामुळे त्याने प्रीप्लान करून तिचा निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

काय आहे खून प्रकरण –

24 जुलै रोजी दुपारी मुलगी दुकानाला सामान खरेदी करण्यासाठी गेली. रात्री सव्वा सात वाजता आसखेड खुर्द गावाच्या हददीतील लिंभोरेच्या ढव-याच्या शिवारात आसखेड कॅनलच्या दरडी लगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली टणटणीचे झुडपात अडचणीमध्ये त्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मुलीच्या मामाने चाकण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

ही घटना रात्रीच्या वेळी उघडकीस आली होती. घटनास्थळ अतिशय निर्जन होते. तिथे नेटवर्क कमी होते. वाहन जाऊ शकत नव्हते तसेच पाऊस देखील सुरु होता.

गुन्हा दाखल केल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिघांवर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले.

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून मुलीचा खून केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्या संशयावरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलीस ताब्यात घेतलेल्या तिघांकडे तपास करीत होते. त्याचबरोबर अन्य मार्गाने देखील पोलिसांचा तपास सुरु होता.

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे पाठविण्यात आला. परंतु काही राजकीय पक्षाचे प्रतीनिधी तसेच नातेवाईकांनी शवविच्छेदन चाकण येथे न करता वायसीएम किंवा ससून हॉस्पिटल येथे करावे अशी मागणी केली.

त्यानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून येथे पाठविण्यात आला. त्यामुळे शवविच्छेदन होण्यास व शवविच्छेदन अहवाल प्राप्त होण्यास विलंब झाला.

अल्पवयीन मुलीच्या खून प्रकारातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक आणि राजकीय पदाधिका-यांकडून करण्यात आली. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुलीच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. पोलीस अधिका-यांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

धागा सापडला….

चाकण पोलिसांनी या प्रकरणासाठी विशेष पथकांची नेमणूक केली. ही पथके, गुन्हे शाखेची पथके अहोरात्र समांतर तपास करीत होती.

पोलीस तांत्रीक, शास्त्रोक्त, बातमीदारांकडून, भाौगोलीक परिस्थिती अशा सर्व बाजूंनी तपास करीत होते. नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे जबाब नोंदवले जात होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस व गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे तसेच पथकातील कर्मचारी हे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून त्याची पडताळणी करीत होते.

नातेवाईकांकडे चौकशी करतांना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्या. त्यामुळे प्रत्येक बाबीची मुळापासून खात्री करणे व त्या दृष्टीने तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

चौकशी दरम्यान नातेवाईकांपैकी एका अल्पवयीन मुलाच्या चौकशीमध्ये पोलिसांना गडबड जाणवली. त्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मयत मुलीचा शोध घेत असताना मृतदेह मिळाल्यानंतर मृतदेहाकडे जाऊन मुलगी मयत झाल्याचे पाहून खात्री करण्याअगोदर मुलीच्या घरी जाऊन मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याचे पोलीस तपासात समोर आले.

मुलाने खात्री न करताच ती मयत असल्याचे सांगितल्याचा धागा पकडून पोलिसांनी पुन्हा तपास सुरु केला. मुलाने मयत मुलीला दुपारी तीन वाजता मटकीचा डबा दिल्याचे सांगितले. त्यानंतर ती घरी गेली.

मुलीने दुकानातून खरेदी केलेल्या वस्तू पिशवीत घालून घरी नेल्या. पण त्या सर्व वस्तूंची माहिती मुलाने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांशी चर्चा करून मुलाकडे कसून चौकशी केली असता मुलाने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

….म्हणून त्याने तिचा दगडाने ठेचून खून केला

मयत मुलगी त्याची नात्याने मावशी लागते. दोघेही एकाच वयाचे आहेत. बालपणापासून दोघे एकत्र खेळले, वाढले आहेत.

त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होत होते. तो भारुडाच्या कार्यक्रमात स्त्री पात्र करतो. त्यावरून ती त्याला अलीकडच्या काळात हिजडया सारखा काय वागतो. हिजडया सारखे काय हसतो असे बोलून हिणवत असे.

त्या गोष्टीची त्याला चिड व संताप होता. तसेच ती इतरांशी चांगले बोलते व त्याच्याशी नीट बोलत नाही, याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने तिला मारण्याचे ठरविले.

त्याला काईम पेट्रोल, सावधान इंडीया, अश्लिल व्हिडीओ पाहण्याची सवय आहे. त्यामुळे त्याने स्वतः मनात आखणी करून तिला मारण्याचे ठरविले होते.

घटनेच्या दिवशी मयत मुलगी ही दुकानात गेल्याचे त्याला माहित होते. तिला परत येण्यास वेळ लागणार याची त्याला जाणीव होती.

तिच्या घरातून दुकानाकडे जाण्याच्या रस्त्यावर त्याचे घर आहे. ती दुकानात जाताना व परत येताना तो तिच्याशी वारंवार फोनवर बोलत होता.

ती सध्या कुठवर पोहचली आहे, याची माहिती घेत होता. ती दुकानाकडे गेल्यानंतर तीला परत येण्यास लागणा-या वेळेचा विचार करून त्याने तिच्या घरी परत जाण्याचे मार्गावर ओढयातील निर्जन स्थळी एक मोठा दगड आणून ठेवला तसेच सागाच्या झाडाची फांदी आणुन ठेवली.

तयारी केल्यानंतर तो परत घरी येवून तिची वाट पहात थांबला. त्यानंतर थोडयाच वेळात तिची मोठी बहीण घरी येणार असल्याने व तिला जेवण तयार करायचे असल्याने दुकानातील वस्तू घेऊन गडबडीने घरी निघाली होती.

ती मटकी घेण्यासाठी त्याच्या घरी आली. त्याने तिला मटकीचा डबा घराबाहेर आणून दिला.

ती दुकानावरून आणलेले सामान आणि मटकीचा डबा घेऊन घराकडे निघाली. त्याच वेळी तो धावत जाऊन दुस-या मार्गाने नियोजित ठिकाणी तिच्या येण्यापूर्वी पोहोचला आणि झाडाची फांदी घेऊन लपून बसला.

ती जवळ येताच अचानक त्याने तिच्यावर हल्ला केला. तिला पालथे पाडून तिच्या तोंडात कापडी बोला घातला आणि डोक्यात मोठा दगड घालून तिचा निर्घुणपणे खून केला.

खून केल्यानंतर त्यानी पुरावा नष्ट करण्यासाठी तिला खांद्यावर उचलून कॅनलच्या दरडी जवळ नेले. तिचे कपडे काढले आणि विवस्त्र मृतदेह लिंबाच्या झाडाखालील टणटणीच्या झुडपात कोणाच्या निदर्शनास येणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवला.

तिचे कपडे, मोबाईल फोन, मुलीने दुकानातून घेतलेल्या वस्तू असे सर्व सामान पिशवीत भरले. ते सर्व साहित्य त्याने दुसरीकडे लपवून ठेवले. घरी येऊन अंघोळ करून स्वतःचे कपडे बदलले.

त्यानंतर मुलीची शोधमोहीम सुरु झाल्यानंतर तो देखील त्या शोधमोहिमेत सहभागी झाला. मुलीच्या चुलत मामाला तिचा मृतदेह सापडला. त्यावेळी तो दूरवर होता.

मृतदेह सापडल्याचे लक्षात येताच, त्याने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्याअगोदर तिच्या घरी जाऊन तिच्या बहिणीला व भावाला सांगितले की, ‘ती आता या जगात राहिली नाही’.

अल्पवयीन मुलाने काईम पेट्रोल, सावधान इंडीया, कंचना-1, कंचना-2 हे दाक्षिणात्य चित्रपट तसेच इतर मालिका पाहून पुरावा नष्ट करण्याची कल्पना शोधली होती. मुलाने लपवून ठेवलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

त्याला येरवडा बाल न्यायमंडळाचे पीठासीन अधिकारी यांच्यासमोर हजर केले आहे. तसेच संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा अहवाल देखील पोलिसांनी न्यायालयात पाठवला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त स्मीता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उप निरीक्षक भाउ डुबे, पोलीस कर्मचारी सुरेश हिंगे, विठठल कुंभार, राजु जाधव, पोना संजय जरे, अनिल गोरड, बापु सोनवणे, हनुमंत कांबळे, विरसेन गायकवाड, प्रदिप राळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखील वर्षे, अशोक दिवटे, मछिंद्र भांबुरे, उध्दव गर्जे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक भाउ डुबे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.