Hinjawadi Crime News : शाब्दिक वादातून एकाचा खून, तिघांना अटक 

एमपीसी न्यूज – शाब्दिक वादातून मारहाण करून एकाला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4) रात्री सव्वाअकरा वाजता हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली. खूनाचा कट रचणा-या पाच जणांपैकी तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. 

राजकुमार मुरलीधर घुगे (वय. 24, रा. एम आय डी सी, पोलीस वसाहत महेश्वरी नगर जवळ, अंधेरी ईस्ट) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रमेश तुकाराम गायकवाड (वय 48, रा. कांदिवली ईस्ट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नंदकुमार श्रीपतराव ढोकळे (वय 55, रा. हिंजवडी, मुळशी), प्रमोद नंदकुमार ढोकळे (वय 32, हिंजवडी, मुळशी), प्रशांत नंदकुमार ढोकळे (वय 35, रा. नेरे, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तसेच इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजकुमार आणि आरोपी नंदकुमार यांची गुरुवारी रात्री हिंजवडी मधील एका वाईन्स शॉपसमोर किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी रमेश, मयत राजकुमार आणि त्यांचे मित्र लक्ष्मी चौकातील रेड अँड ग्रीन व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले.

फिर्यादी रमेश, मयत राजकुमार आणि त्यांचे मित्र जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले असता आरोपींनी आपसात संगनमत करून राजकुमार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात राजकुमार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी रमेश यांना ‘इथे न थांबता पुणे सोडून जाण्याची धमकी दिली.; पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.