Sangvi Crime : विवाहापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून

एमपीसी न्यूज – पत्नीचे विवाहापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून पतीने पत्नीच्या विवाहापुर्वीच्या प्रियकराचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालय औंध कॅम्पच्या आवारात घडली.

सौरभ व्यंकट जाधव (वय 28, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत सौरभ याचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव (वय 24) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आयाज शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि सोन्या बाराथे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयाज याच्या पत्नीचे विवाहापूर्वी मयत तरुण सौरभ याच्यासोबत प्रेम संबंध होते. त्यानंतर आयाजचा त्या तरुणीसोबत विवाह झाला. मात्र, विवाहापूर्वी असलेल्या प्रेम संबंधाचा राग आयाज याच्या मनात होता. त्या रागातून आयाज याने त्याच्या मित्रासोबत मिळून सौरभ याला औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नेऊन कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. सौरभ याच्या कानावर, मानेवर तसेच हातावर गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.