Pune News : पुण्यात भंगार गोळा करण्याचा वादातून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : भंगार गोळा करण्यावरून वाद झाल्यानंतर एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. पुण्यातील दारुवाला पुलाजवळील आरएमसी महाविद्यालय परिसरात आज पहाटे ही घटना घडली. अमन यादव (वय 27) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अमन हा भंगार गोळा करण्याचे काम करतो. भंगार गोळा करण्यावरूनच त्याचे एका तरुणासोबत भांडण झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात यावरूनच कुरबूर होती. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास अमन हा दारूवाला फुल परिसरात गेला असता त्याचे आणि आरोपीचे पुन्हा एकदा भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने अमनवर चाकूने वार केले.

चाकूचा वार पोटात झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि अमनचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मात्र पळ काढला. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.