Maval News : जमिनीत हिस्सा मागत व्यावसायिकावर खुनी हल्ला; पत्रकारासह चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने खरेदी केलेल्या जमिनीत हिस्सा अथवा पैसे देण्याची मागणी करत चार जणांनी व्यावसायिकावर कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये एका पत्रकाराचा देखील समावेश आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 25) सायंकाळी मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडला.

कालिदास साहेबराव गाडे (वय 40, रा. सुदुंबरे, ता. मावळ) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय गायकवाड (रा. कामशेत, ता. मावळ), पत्रकार कांबळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी सुदवडी येथे गट नंबर 157 व 158 मधील जमीन विकत घेतली आहे. त्या जमिनीत आरोपी हिस्सा अथवा पैसे मागत होते. याबाबत आरोपींची आणि गाडे यांची दोन ते तीन वेळेला बैठकही झाली. त्यात आरोपी अक्षय याने धमकी दिली. तर त्याचा मेहुणा पत्रकार कांबळे याने ‘मी पत्रकार आहे. बघ मी काय करतो ते’ अशी धमकी दिली.

बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी अक्षय याने गाडे यांना कोयत्याने मारून प्राणघातक हल्ला केला. मात्र गाडे यांनी कोयत्याचा वार चुकवला. त्यानंतर सर्व आरोपींनी गाडे यांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्रकार कांबळे याच्याबाबत अधिक माहिती मिळाली नसून तो खरेखर पत्रकार आहे की तोतया हे तपासात स्पष्ट होईल. मात्र गाडे यांना धमकी देताना कांबळे याने तो पत्रकार असल्याचा उल्लेख केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.