Pimpri Crime News : मित्रांसोबत दारू पीत असलेल्या तरुणावर खुनी हल्ला

परस्पर विरोधात गुन्हा दाखल, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – घराच्या इमारतीच्या पार्किंग मध्ये मित्रांसोबत दारू पीत बसलेल्या तरुणावर आठ जणांनी रॉड आणि दांडक्याने मारत खुनी हल्ला केला. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

अनिकेत अनिल जाधव (वय 19, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल रणखांबे, आकाश रणखांबे, बाळा कांबळे, संजय कांबळे, दीपक जावळे, बाळा जावळे, ईश्वर कांबळे, अजय लोंढे (सर्व रा. विठठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जाधव आणि त्यांचा मित्र रोहित शिंदे त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी रात्री दारू पीत बसले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने रॉड आणि दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात जाधव गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आरोपी विशाल, आकाश, संजय, दीपक आणि ईश्वर या पाच जणांना अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात आकाश युवराज रणखांबे (वय 26, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत अनिल जाधव, सुशांत अनिल जाधव, रोहित शिंदे, अतुल डोंगरे, टोंनकचा भाऊ (पूर्ण नाव माहिती नाही), आणि त्यांचे साथीदार (सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणखांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी रणखांबे त्यांचे चुलते विष्णू मुंजाजी रणखांबे यांच्या घरी जेवण करण्यास जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव आणि रोहित शिंदे या दोघांनी रणखांबे यांच्या डोक्यात रॉडने मारून जखमी केले. फिर्यादी रणखांबे यांना उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला वायसीएम रुग्णालयात फायटरने मारहाण केली. फिर्यादी यांचे मामा त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असताना आरोपींनी त्यांना हॉस्पिटलच्या गेटसमोर अडवून फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी आरोपी रोहित शिंदे याला अटक केली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.