Raigad : मुरुड जंजि-यावर फडकला तिरंगा

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा या अभेद्य किल्ल्यावर भारताचा तिरंगा कायमस्वरूपी फडकला आहे. यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेने वेळोवेळी पाठपुरावा केला असून संस्थेच्या पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे. पुरातत्व विभागाने किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकविण्यास मंजुरी दिली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक अनिल परासकर, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे आणि सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जंजिरा हा एकमेव किल्ला आहे जेथे भगवा कधीच फडकला नाही. देशाच्या स्वातंत्र्यांनतर येथे तिरंगाही डोलला नाही. जनचळवळीच्या विजयानंतर एकदा तिरंगा फडकला. त्यालाही आता दशके लोटली आहेत. भारतीय सागरी दुर्गाच्या इतिहासातील अभेद्य किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. काही शिवप्रेमींनी भगवा झेंडा किल्ल्यावर फडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यास काही लोकांनी विरोध केला. त्यातून किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेने पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने ध्वज संहिता घालून कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आदेश २ ऑगस्ट २०१८ रोजी दिले. त्यानुसार आज (रविवारी) किल्ल्यावर तिरंगा डौलाने फडकविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.