BNR-HDR-TOP-Mobile

संगीत आणि दत्तगुरु

INA_BLW_TITLE

(सतीश वैद्य)

एमपीसी न्यूज- गायन वादन नृत्य म्हणजे संगीतकलेमधील ही एक त्रयी आहे. संगीतसाधना नादब्रह्माची साधना म्हणजेच दत्तगुरुंची आराधना आहे. कुणाही सद्गुरूंकडे आपण गेलो की भजन आरती श्लोक वगैरेतून संगीतसाधना करण्यास सांगितले जाते. संगीतसाधना दत्तप्रभुना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच दत्तगुरु आणि संगीत यांचा परस्पर संबंध आहे.

चांगले कर्णमधुर गीत म्हणजे संगीत असा अर्थ रूढ आहे. तरीपण संगीत कलेमधे वादन व नृत्य ह्या दोन अंगांचा समावेश होतो. म्हणजे संगीताची व्याख्याच तशी आहे. गायन स्वयंपूर्ण आहे म्हणजे गाण्यासाठी फक्त आपला गळा, आवाज सूर आवश्यक आहे. वादनामध्ये वाद्य लागते आणि नृत्यात गायन व वादन हे दोन्ही आवश्यक आहेत. “गळ्यातून निघालेल्या स्वरांची नक्कल संगत वाद्यांतून, तालासूरातून करणे आणि त्या गायनवादनतून कर्णमधूर गीत त्यातील भाव शब्दार्थासहित मुद्राभिनयातून प्रकट करणे म्हणजे नृत्य होय” म्हणजेच जेव्हां गळ्यातून,आवाजातून योग्य तालसूरलयीसह त्या गीतातील भावभावना व्यक्त करायच्या त्याचबरोबर नृत्याभिनयातूनही जेव्हां त्याच भावना प्रकट होतात तेव्हांच खरी कलाकृती रसिक दर्दी प्रेक्षकांपर्यंत पोहोचते व त्यांच्या मनात कायमची घर करून राहते. संगीतकलेमधील ही एक त्रयी झाली… गायन वादन नृत्य.

या शिवाय ही कला सादर करण्यासाठी दुसरी त्रयी…”सूर ताल लय” पाहू या. सूर(स्वर)-ध्वनि-नाद यामधे–“आहत आवाजापैकी संगीतोपयोगी आवाजास किंवा ध्वनिस नाद म्हणतात. गोड ध्वनिची कंपनसंख्या नियमित नियंत्रित असते. अशा ध्वनिस शास्त्रकार संगीतोपयोगी मधूर कर्णमधूर मानतात. उलट ज्यांची कंपनसंख्या अनियमित अनियंत्रित असते त्या ध्वनिस सूर म्हणता येत नाही तर गोंगाट किंवा चित्रविचित्र आवाज म्हणता येईल.”

आधुनिक विज्ञानाच्या योगाने नादांची कंपनसंख्या नियमित आहे की नाही हे यंत्राने पाहता येते.परंतु प्रत्येकवेळी यंत्राने पडताळा पाहणे अव्यवहार्य होईल. आपला कान ते काम उत्तमरीतीने करतो म्हणून कानाला गोड लागणारा-मनाला आनंद देणारा ध्वनि तो “नाद” समजावा. नादाची उच्चनिचता त्याच्या कंपनसंख्येवर अवलंबून असते. कमी कंपने अर्थात नादाची उंची कमी, तर जास्त कंपने म्हणजे नादाची उंची जास्त.या गुणधर्मामुळे “मंद्र-मध्य-तार” या स्थानांचे नाद ओळखू येतात. एका नादाच्या तुलनेत स्पष्टपणे वेगळा ऐकू येणारा, श्रोत्यांच्या कानाला-मनाला आनंद देणारा-आत्मानंद देणारा-नियमित व नियंत्रित कंपनसंख्या असणारा जो नाद त्याला स्वर किंवा सूर म्हणतात.

हिंदुस्थानी संगीत पध्दतीत ‘ताल’ हे एक मुख्य वैशिष्ठय आहे. सृष्टीच्या उत्पत्तिपासून अव्याहतपणे चालणारा काळ किंवा काल, त्याला संगीतासाठी उपयोगात आणायचा तर ठराविक मापांनी बांधावा लागला. हे माप अर्थात कालमापनातील सेकंद. याला तालातील “मात्रा” बनवली गेली व मात्रांची ठराविक संख्या घेऊन वेगवेगळे गट किंवा संच केले गेले तेच “ताल”. या मात्रांना समप्रमाण गतिचे बंधन घातल्यास “लय” होते..(speed). गीत संगीत कर्णमधूर आनंददायी होण्यासाठी सूर ताल लय अत्यंत आवश्यक असे तीन घटक आहेत..”त्रयी”..साहित्यात जशी गुणवृत्ते-मात्रावृत्ते तशीच संगीतात वेगवेगळे ताल . मात्रांमध्ये मोजलेली लय तीन प्रकारची असते. ही मात्रा एक सेकंदाची धरली तर “मध्यलय”.मध्यलयीपेक्षा दुप्पट सावकाश लयीला विलंबित किंवा ठायी आणि मध्यलयीपेक्षा दुप्पट जलद असते तिला द्रूतलय म्हणतात. “विलंबित,मध्य,द्रूत” ….”त्रयी”..

मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट परमेश्वरप्राप्ति-आत्मज्ञान हेच आहे. म्हणूनच बुध्दी, विवेकबुध्दी ही फक्त मनुष्यप्राण्यालाच परमेश्वरानं दिली आहे. माणूसच जाणू शकतो परमेश्वर म्हणजे कोण ? स्वतः कोण आहोत ? आत्मज्ञान तथा ब्रम्हप्राप्तिचे भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग तथा मंत्रयोग म्हणजे नादयोग हे प्रमुख मार्ग किंवा पंथ आहेत. नादयोगात एक महत्वाचा सिध्दांत असा आहे की “या ब्रम्हांडाचा, विश्वाचा, सृष्टीचा उगम, उत्पत्ति, जन्म ध्वनित शब्दात नादात झाला आहे” याची बैठक पूर्ण शास्त्रीय व तर्काला-बुद्धिवादाला मान्य झालेली आहे. तो ध्वनि म्हणजे (ओम् ).ओम्कार। प्रचंड ऊर्जेचे महाकाय दोन गोळे एकमेकावर आदळून त्यांचे अगणित लहानमोठ्या आकाराचे तुकडे अवकाशात कोटीकोटी मैलांवर उडाले,Bigbang. हे दोन प्रचंड महाकाय गोळे महाऊर्जेसहीत अवकाशात आले कसे व कुठून? त्यांची टक्कर का व कशी झाली ? गुरूत्वाकर्षण, इतकी प्रचंड ऊष्णता हे सर्व आले कुठून? हे सर्व मानवाच्या बुध्दिला कळणारे नसल्यामुळे त्याने त्या ऊर्जेला चैतन्याला ईश्वर, परमेश्वर, सर्वाचा नियंता (superpower) म्हटले, ब्रह्म म्हटले.

वेदांपासून आपल्या रोजच्या उपयोगात येणार्‍या भाषेला-वाङमयाला, साहित्याला ओम्काररूप “शब्दब्रह्म” तसेच ध्वनि आणि स्वरवर्णादिमुळे निर्माण होणार्‍या लहरी व त्यांचे अनेकविध प्रभावी कार्य हे सारे “नादब्रह्म”या सदरात येते. स्वरांच्या विशिष्ट रचनांमुळे निर्माण होणारे संगीतसुद्धा नादब्रह्मात समाविष्ट होते.

या विश्वातील प्रत्येक वस्तू ती सजीव असो की निर्जीव,त्या चैतन्याने भरलेली आहे आणि ती उत्पत्ति स्थिती व लय या तीन अवस्थांतून जाते. कशाचीही उत्पत्ति, निर्मिती व्हायला वेळ लागतो, श्रम पडतात. वाढ संथ गतिने होते. पूर्ण वाढ झाली की काही काळ टिकते आणि कालांतराने नष्ट होते. हा निसर्गाचा, सृष्टीचा नियम आहे. आपण रोज अनुभवतो. यालाच उत्पत्ति स्थिती व लय अशा तीन अवस्था म्हटलेल्या आहेत. हे विश्व ओम् कार ह्या मूळ ध्वनितत्वाचा विस्तार किंवा पसारा आहे. विश्वरूपी वृक्षाचा नामरूपरंगमय विकास व विस्तार हा ओम् या ध्वनिबीजाने होतो. त्या दृष्टिने पाहिल्यास ओम् पासून निघालेल्या वर्णमालेतील प्रत्येक अक्षर व ध्वनि हे शक्तिगर्भ आहे म्हणून त्या अक्षरांना कोणत्यातरी देवतेचे अधिष्ठान दिले आहे. ‘अ’ कार हा ब्रह्मा, ‘उ’कार विष्णु, ‘म’कार महेश (रूद्र) मिळून ओम् कार ! वर अर्धचंद्र तो परमेश्वर (मूलप्रकृति,सर्वसाक्षी,सर्वशक्तिमान)म्हटला आहे.त्याचप्रमाणे ‘न’काराची देवता प्राण(वायु) आणि ‘द’काराची अग्नि यांच्या संयोगान उत्पन्न होतो तो ‘नाद’ ! असो.आता या ओम् काराच्या तीन मुख्य देवताकडे दिलेली कार्ये…तक्ता पाहू..

ब्रम्हा विष्णु महेश
उत्पत्ति स्थिती लय
जागृति स्वप्न सुषूप्ति
स्थूलदेह सूक्ष्मदेह कारणदेह
ताल सूर लय
वादन गायन नृत्य
विलंबित मध्य द्रूत
मंद्र मध्य तार
भूत वर्तमान भविष्य
रजोगुण सत्वगुण तमोगुण

अशा अनेक आणखी त्रयी असतील. या सर्व मिळून दत्तप्रभु/दत्तगुरू म्हटलं तर चूकीचं होणार नाही असं मला वाटतं. म्हणूनच असं म्हणतात की ,संगीतसाधना नादब्रह्माची साधना म्हणजे दत्तगुरुंची आराधना आहे. कुणाही सद्गुरूंकडे आपण गेलो की भजन आरती श्लोक वगैरेतून संगीतसाधना सांगितली जाते. ती दत्तप्रभुना अतिशय प्रिय आहे.

आपण संगीतकला म्हणजे गायन, वादन, नृत्य सादर करताना सुरवातीला विलंबित मग मध्य आणि शेवटी द्रूत लयीत एक एक स्वर वर वर जातो. मंद्र मध्य तार सप्तकात गातो, वाजवतो आणि शेवट करतो. या तीन अवस्थांमधून कला सादर केली जाते. संगीतसाधनेत जेव्हां आपण एकरूप होतो, आपल्याला आजूबाजूचे भान राहत नाही, वेळेच भान राहत नाही तेव्हां आपण एकप्रकारें समाधी, तूर्यावस्था अनुभवतो. स्वतःला विसरतो आणि त्या दत्तप्रभुंशी तादात्म पावतो, विलय पावतो. जेव्हां लय अतिद्रूत होते तेव्हां सादरीकरण संपतं. गाण वादन नृत्य संपतं..!

आता सध्याच्या युगात आपण पहातो की सर्व गोष्टी fast होत आहेत. सर्वच बाबतीत गति वाढलेली आहे. सगळ्याची घाई सर्वत्र दिसते. संगीतामधे नृत्य जास्त दिसतय. संगीतकला ही कानाकडून डोळ्यांकडे येऊ पाहते आहे. काळाची लय वाढली आहे. एकंदरीतच सृष्टिची समष्टीची लय वाढली आहे. ही लय जेव्हां प्रकर्षाने वाढते तेव्हां त्या स्थितीला प्र-लय म्हणजेच सृष्टि समष्टीच परमेश्वराशी विलय पावणं..एकरूप होणं..!

HB_POST_END_FTR-A2

.