Chinchwad News : चळवळींना गतिमान करण्यासाठी संगीत प्रभावी माध्यम ठरले – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – जगाच्या पाठीवर विविध सामाजिक चळवळीचा इतिहास पाहिल्यास चळवळींना गतिमान करण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम ठरले असून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत देखील संगीताची भूमिका महत्वपूर्ण होती.देशवासीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भारत देशाची महती सांगणाऱ्या अनेक देशभक्तीपर गीत संगीताची रचना करून स्वातंत्र्य लढा सर्वसमावेशक करण्यामध्ये संगीताने महत्वपूर्ण भूमिका बजावली, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी – चिंचवड महापालिका आणि पिंपरी – चिंचवड संगीत अकादमी यांच्यावतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये “स्वर अमृत” या देशभक्तीपर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, प्रसिद्ध पार्श्वगायिका योगिता गोडबोले, गायक राजेश दातार, डॉ. अशोक कोल्हे, उपआयुक्त संदिप खोत, रविकिरण घोडके, गायिका प्रज्ञा देशपांडे, अदिती गराडे, मोनाली दुबे, श्रुती देवस्थळी, प्राजक्ता मांडके, डॉ. राजू दुरकर, पद्माकर गुजर, ऋतुराज कोरे, व्यंकटेश गरुड, मिहीर भडकमकर, प्रभारी क्रिडा अधिकारी  अनिता केदारी, पर्यवेक्षक अनिल जगताप, समीर सूर्यवंशी  यांच्यासह रसिक, प्रेक्षक, नागरिक उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जागृत करण्यासाठी, प्रत्येक घरामध्ये चैतन्य पसरावे यासाठी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, महापालिकेच्यावतीने देखील विविध उपक्रम राबवून हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्ताने स्वर अमृत हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.संगीत माणसाला प्रफुल्लीत करते, उत्साहित करते, संगीतामध्ये भावभावना व्यक्त करण्याची मोठी ताकत आहे. त्यामुळे अनेक देशांच्या सामाजिक चळवळींना दिशा देणे आणि ती चळवळ गतिमान करण्यामध्ये संगीताने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळ देखील अपवाद नाही. स्वातंत्र्योत्तर काळखंडामध्ये लतादीदींची गाणी नागरिकांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरली, असे ते म्हणाले.

प्रारंभी आयुक्त पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वर अमृत या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी सहभागी गायिका योगिता गोडबोले यांनी आपल्या मधुर आवाजाने देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून उपस्थित रसिकांची मने जिंकली. तर राजेश दातार यांनी  स्वातंत्र्य चळवळीत आपले प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.