Pune : बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावर सांगीतिक नृत्य नाटिका

एमपीसी न्यूज – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावर आधारित ‘परिमळ’ या सांगीतिक नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डेस्टिनी सेंटर फॉर इन्फर्मेशन, डॉक्युमेंटेशन एंड रिसर्च’ आयोजित तेजदिप्ती पावडे प्रस्तुत हा कार्यक्रम रविवारी २९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे.

कथा संकल्पना, नृत्य दिग्दर्शन तेजदिप्ती पावडे यांचे आहे. जगणे, भवताल आणि आयुष्यावर टोकदार, प्रभावी भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या आयुष्याचा, काव्य प्रवासाचा मागोवा नृत्य, संगीत आणि नाट्य याद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आयुष्याचा प्रवास या नृत्य नाटिकेतून घेतला जाणार आहे. १८८० मध्ये जन्मलेल्या अहिराणी ग्रामीण शैलीत अजरामर काव्यरचना करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनाच ही नृत्य नाटिका समर्पित आहे.

एकूण २५ कलाकार या नृत्य सादरीकरणात सहभागी होणार आहेत. ‘ मन वढाय, वढाय ‘,   ‘गुढी पाडव्याचा सण, आता उभारारे गुढी ‘,अरे, संसार संसार ‘,  ‘खोप्यामधी खोपा, सुगरणीचा खोपा ‘,  ‘जाय आता पंढरीला ‘,’ आज माहेराला जाणं, झाली झाली गं पहाट ‘ बहिणाबाईंच्या अशा अनेक कविता बहारदार नृत्यासह नजाकतीने सादर केल्या जाणार आहेत. ‘बहिणाबाईंच्या काव्यातील भावनांचा शोध घेत आम्ही जळगाव जिल्हयात त्यांच्या गावी गेलो. दोन वर्षे तयारी करुन ‘ परिमळ ‘ हा सांगितिक नृत्य कार्यक्रम तयार केला. हा बहिणाबाई यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे’, असे तेजदिप्ती पावडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले. देणगी प्रवेशिका भरत नाट्य मंदिर येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.