Talegaon Dabhade News : लोकप्रतिनिधींच्या परस्पर मुख्याधिकाऱ्यांनी केली साडेतीन कोटींची बिले ठेकेदारास अदा

एमपीसी न्यूज – कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी करून देखील तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांनी पाणी योजनेच्या ठेकेदारास सुमारे साडेतीन कोटी रूपयांची बिले आदा केली. असा आरोप तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांनी केला आहे.

तसेच बिले अदा केलेल्या ठेकेदाराला लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी बोलवावे. आपण प्रभारी असल्याने धोरणात्मक निर्णय घेणार नसल्याचे सांगत मुख्याधिकारी अनेक कामांना बगल देतात. त्यांनी पाणी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेणारी बैठक सर्वपक्षीय नगरसेवक आणि संबंधित ठेकेदारासोबत आयोजित करावी अशी मागणी देखील उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी पाणी योजनेच्या ठेकेदारास 3 कोटी 49 लाख रुपयाचे बिल अदा केले आहे, सदर रक्कम देण्यापूर्वी संबंधित ठेकेदारास नगरपालिकेत चर्चेस पाचारण करून नगरसेवकांच्या समवेत पुढील कामाचा आढावा घेत व प्रलंबित कामांविषयी नियोजन करून पेमेंट द्यावे असा वारंवार आग्रह मुख्याधिकारी यांच्याकडे धरला होता. तरीदेखील सभापती, गटनेते किंवा प्रमुख नगरसेवकांशी कोणतीही चर्चा न करता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी परस्पर सदर ठेकेदारास बिल अदा करून टाकले आहे एवढ्या मोठ्या रकमेचे दोन भाग करून पुढील कामाच्या प्रगतीवर दुसरा चेक दिला असता तर ठेकेदारावर अंकुश राहिला असता असेही पत्रकात उपनगराध्यक्ष सैंदाणे यांनी म्हटले आहे.

सदर ठेकेदाराच्या माणसांबरोबर किंवा सब कॉन्ट्रॅक्टर  बरोबर अनेक वेळा अनेक वेळा चर्चा करून मिनिट्स ऑफ मीटिंग घेतल्या गेल्या होत्या व कामाचे नियोजन सभापती या नात्याने केले होते, आज पर्यंत मुख्याधिकारी यांनी पाणी योजनेचा प्रगतीचा कोणताही आढावा किंवा प्रत्यक्ष पाहणी दौरा न करता सदर ठेकेदाराचे एवढे मोठे बिल परस्पर दिल्यामुळे त्याला जाब विचारायचा अधिकार आपण नगरपालिकेने गमावला असल्याची घणाघाती टीका सैंदाणे यांनी केली.

तळेगाव स्टेशन विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीच्या योजनेची जॅकवेल , नवीन पंप,  सोमाटणेयोजने पर्यंत जाणारा ब्रिज, जाणारी नवीन पाईप लाईन शिफ्टिंग, इतर टाक्यांची कामे यांचा आढावा मुख्याधिकारी यांनी  सभापती व इतर सदस्य समवेत घेणे आवश्यक होते असे न करताच अत्यावश्यक निर्णय घेताना लोकप्रतिनिधी यांना विचारात न घेता हा निर्णय घेतला आहे, एकीकडे मुख्याधिकारी मी प्रभारी आहे मी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेणार नाही असे सांगत अनेक कामांना बगल देत आहेत असे असताना दुसरीकडे असा निर्णय करतात हे नक्कीच अचंबित करणारे असल्याचे सैंदाणे यांनी म्हटले आहे.

आतातरी मुख्याधिकारी यांनी सदर ठेकेदारास पाचारण करून सभागृहात एक सर्वपक्षीय नगरसेवकांबरोबर या पाणी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेणारी बैठक घ्यावी किंवा आपण परस्पर या योजनेच्या प्रगतीचा पाठपुरावा करणारी भूमिका तरी बजवावी व आपले कर्तव्य याच घाईघाईने बजावावे अशी उपरोधिक टिका उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांनी केली. त्याचबरोबर पाणी बिलात असलेल्या त्रुटी, माननीय कमिशनर यांचा आदेश, नागरिकांना बिलात लावण्यात येणारे दंड व्याज यावरही मुख्याधिकारी या नात्याने नागरिकाचे निर्णय घ्यावेत असा आमचा आग्रह असल्याचेही पत्रकात सैंदाणे यांनी म्हटले आहे.

यामुळे तळेगाव शहरातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.