Chinchwad Crime News : सोसायटीच्या करारनाम्यावर खोट्या सह्या करून 20 सदनिकांची परस्पर विक्री; फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हाऊसिंग सोसायटीच्या करारनाम्यावर खोट्या सह्या करून तशी कागदपत्रे तयार केली. त्याआधारे सोसायटी मधील 20 सदनिकांची परस्पर विक्री करून फसवणूक केली. हा प्रकार 4 जानेवारी 2018 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

भारती निंबा भारंबे, रवी कृष्ण चोपडे, मल्लिनाथ भीमाशंकर नोल्ला, सदर मिळकतीत राहणारे अज्ञात इसम (सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उल्हास पंडित बोरोले (वय ४८, रा. निंबोरा, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांनी 18 मे 2022 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी रवींद्रसिंग कच्छवाहा यांनी वाल्हेकरवाडी येथील स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटीमध्ये अनुक्रमे 2900 आणि 1450 चौरस फूट क्षेत्र खरेदी केले होते. त्यावर भारती निंबा यांनी अनधिकृतपणे ताबा घेतला. तिथे बांधकाम करून फिर्यादी यांच्या नावाच्या खोट्या सह्या करून करारनामा व कागदपत्रे तयार केली. त्या इमारतीमधील 20 सदनिका फिर्यादी यांच्या परस्पर विक्री करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.