Pimpri : अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद

‘साद फौंडेशन’च्या वतीने दिव्यांग बांधवाना “दिवाळी फराळ वाटप”

एमपीसी न्यूज – दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. या उत्सवात लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात. देशभरात सर्वत्र हा सण उत्सवात साजरा केला जातो. सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. दरवर्षी शहरातील दिव्यांग बांधवांनाही या उत्सवात सहभागी करत ‘साद सोशल फौंडेशन’ च्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज माझ्या अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली, असे मत साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

साद सोशल फौंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. २३) आकुर्डीतील खंडोबा मंदिर सांस्कृतिक हॉल या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहरातील अंध-दिव्यांग बांधवांच्या कुटुंबीयांना “दिवाळी फराळ वाटप” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इरफान सय्यद बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेना कामगार नेते व शिवसेना खेड-भोसरी विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, निगडी पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, साद सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, कार्याध्यक्ष परेश मोरे, संघटक राहुल कोल्हटकर, उद्योजक भीमसेन अगरवाल, अरविंद सोळंकी, मंगवानी, युवा नेते किसन बावकर, निरंजन अग्रवाल, ए वन मोटर्सचे हाजी लालु भाई, भारत सरकार वित्त मंत्रालय सल्लागार अशोककुमार पगारिया, मातोश्री पतसंस्थेचे संचालक पांडुरंग कदम, पोलीस निरीक्षक शाकीर जेनेडी, उदयोजक संजय सोळंकी, पुणे जिल्हा शिवसेना उपप्रमुख निलेश मुटके, स्टार रोडलाईन्सचे हसनभाई, रमेश चौधरी, दिनकर शेट्टी, संदीप मधुरे, रवी घोडेकर, प्रमोद मामा शेलार, प्रदीप धामणकर, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व दिव्यांग बांधव व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इरफान सय्यद बोलताना पुढे म्हणाले की, साद सोशल फांडेशनच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून अंध बांधवांच्या आशीर्वादाने व सहकारी मित्र यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून समाजातील दिव्यांग व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा छोटासा प्रयत्न ‘साद’ च्या माध्यमातून दरवर्षी राबविला जातो. “दिव्यांगाचे आशीर्वाद हीच आमची उर्जा” याच आशीर्वादाच्या जोरावर गेल्या ६ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम अखंडपणे चालू आहे. मोहननगर येथे ५ ते १० लोकांच्या सहयोगाने सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमात आज २५० ते ३०० दिव्यांग बांधव आनंदाने सहभागी होतात. त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याची अनोखी संधी ते आम्हाला देतात.

दिव्यांग बांधवांना सामाजिक उपक्रमात सहभागी करीत, त्यांच्यात समाजात वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून राबवीत आहोत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अंध कुटुंबीयांना ‘दिवाळी फराळ वाटप’ च्या माध्यमातून सर्वात जास्त समाधान मिळत असून, समाजातील विविध स्तरातील गरजूंना केलेली मदत ही ख-या अर्थाने समाजऋण फेडण्याचे उत्तम साधन आहे. या बांधवांनी दिलेले आशीर्वाद हीच माझी उर्जा आहे.

ज्या उर्जेमुळेच मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. अंध कुटुंबीयांच्या चेह-यावरील पाहिलेला आनंद हा चिरकाल राहण्यासाठी साद सोशल फाऊंडेशनचे सर्व सहकारी सतत प्रयत्नशील राहतील. तसेच संघटनेच्या माध्यमातूनही दिव्यांग बांधवांच्या सामाजिक, प्रशासकीय व दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अंध बांधवांच्या जीवनात ही दिवाळी प्रकाशमय नवचैतन्य घेऊन येवो, याचा माझ्या त्यांना शुभेच्छा.

पोलीस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले की, कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करीत असताना, समाजातील अंध बांधवांच्या चेह-यावरसुद्धा हसु व आनंद मिळवून देण्याकरीता इरफानभाई हे गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना खरी सामाजिक सुरक्षितता मिळत आहे.

अशोककुमार पगारिया यांनी साद फौंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांना प्रेरणा देऊन, समाज त्यांच्या पाठीशी असल्याची भावना जागृत करून दिली. तसेच दिव्यांग बांधवांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून इतरांनीही केले पाहिजे, अशी भूमिका यावेळी विशद केली.

यावेळी ‘साद सोशल फौंडेशन’ च्या वतीने दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात एक हजार अंध कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. महेश शेटे, प्रवीण जाधव, परेश मोरे, राहूल कोल्हटकर, अनिल दळवी, नागेश व्हनवटे, अरुण जोगदंड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी तर, आभार सर्जेराव कचरे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.