Talegaon : माझी बंडखोरी लोकशाही जिंकण्यासाठी, कपबशी चकाकणार! – अॅड. खंडोजी तिकोणे

एमपीसी न्यूज – धनशाही पराभव करून लोकशाही जिंकण्यासाठी आपण बंडखोरी करून ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवीत आहोत, अशी भूमिका मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडोजी बाळाजी तिकोणे यांनी आज मांडली.

मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी अॅड. तिकोणे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यात यश मिळाले नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधून आलेल्या सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचा निष्ठावान व स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून आपण बंडाचे निशाण फडकविल्याचे अॅड. खंडोजी तिकोणे यांनी सांगितले.

एक दिवसात निष्ठा बदलणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहोत. विशिष्ट भागाची मक्तेदारी मोडण्यासाठी व इतर भागातही सक्षम नेतृत्व आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. काहीतरी मोबदला घेऊन आपले मत विकत नाही त्या सूज्ञ मतदारांचा आदर करण्यासाठी आपण बंडखोरी केली, असे अॅड. खंडोजी तिकोणे म्हणाले.

उच्चशिक्षण, दीर्घ अनुभव व समस्यांची जाण असणाऱ्यांची कदर होण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहे. चुकीच्या, अन्याय गोष्टींविरुद्ध बंड करणाऱ्याला शक्ती देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. अनेक वर्ष सर्वच पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आदर करण्यासाठी ही निवडणूक आहे. निस्वार्थपणे काम केल्यास जनता निवडून देते, केवळ पैशाने निवडणुका जिंकता येत नाही, हे सिद्ध करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहे. सामान्य कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपली बंडखोरी आहे, अशी भूमिका अॅड. तिकोणे यांनी मांडली.

देशाच्या प्रमुखाचे एक मत आणि झोपडपट्टीतल्या गरीबाचे एक मत, दोघांच्या मतांचे मूल्य सामान आहे. याची जणीव सर्वांना व्हावी, सर्वसामान्य गरीब माणूस निवडणूक लढू शकतो व निवडून येऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहे, सत्य – असत्याच्या लढाईत कपबशीचा विजय होऊन ती चकाकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वरील भावना ही आपल्या एकट्याची नसून आपलीही तीच भावना आहे ती व्यक्त होण्यासाठी ‘कपबशी’च्या चिन्हापुढील बटण दाबून सर्वांनी मला मतदान करावे, असे आवाहन अॅड. खंडोजी तिकोणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.